लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: मनसेचे राबोडीतील शाखाध्यक्ष जमील शेख यांच्या हत्येच्या निषेधार्थ राबोडीमध्ये मंगळवारी दिवसभर दुकाने बंद ठेवण्यात आली होती. आरोपींच्या अटकेच्या मागणीमुळे तणाव निर्माण झाल्यामुळे संपूर्ण राबोडीमध्ये राज्य राखीव दलाच्या तुकडीसह मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता.शेख यांच्या हत्येच्या पार्श्वभूमीवर राबोडीत तणाव निर्माण झाल्यामुळे गुन्हे अन्वेषण विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त संजय येनपुरे, प्रविण पवार, उपायुक्त अविनाश अंबुरे, उपायुक्त श्रीकृष्ण कोकाटे, मुख्यालयाचे सहायक पोलीस आयुक्त मंदार धर्माधिकारी, नौपाडा विभागाच्या सहायक पोलीस आयुक्त नीता पाडवी यांच्यासह मुख्यालयातील राखीव कुमक तसेच राज्य राखीव दलाची तुकडीही राबोडी पोलीस ठाणे, जमील यांचे घर, राष्ट्रवादीचे नगरसेवक नजीब मुल्ला यांचे घर तसेच मुख्य बाजारपेठ आणि राबोडीतील धार्मिक स्थळांच्या ठिकाणी तैनात केली होती. जमील यांच्या हत्येतील आरोपींना अटक करावी त्यानंतरच त्यांचे पार्थिव ताब्यात घेतले जाईल, अशी भूमीका मनसेचे नेते अभिजित पानसे, ठाणे जिल्हा संपर्क प्रमुख अविनाश जाधव आदींनी राबोडी पोलीस ठाण्यात पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चेअंती घेतली. या संपूर्ण प्रकरणाची नि:पक्षपणे चौकशी केली जाईल, आरोपींना लवकरच अटक केली जाईल. मात्र शेख कुटूंबीय तसेच स्थानिकांनी जमील यांचे पार्थिव ताब्यात घेऊन दफनविधी करावा, अशी समजूत उपायुक्त अंबूरे यांनी जमील यांच्या पत्नीसह कुटूंबियांची घालण्याचा प्रयत्न केला. पोलिसांना तपासासाठी पुरेसा वेळ दिला जावा, असेही ते यावेळी म्हणाले. मात्र, नातेवाईक आपल्या भूमीकेवर ठाम राहिले.* खबरदारीचा उपाय म्हणून राबोडीतील काही भागांमध्ये पोलिसांनी नाकाबंदी केली होती. तसेच व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे मंगळवारी दुकाने बंद ठेवली होती.
‘‘ या खूनाच्या तपासासाठी वेळ मिळणे आवश्यक आहे. नजीब मुल्ला यांच्यावर जरी संशय व्यक्त केला असला तरी त्यांचा यात नेमकी काय रोल आहे किंवा कसे? याचीही पडताळणी सुरु आहे. पोलीस यंत्रणेवर विश्वास ठेवावा. अजून कोणालाही ताब्यात घेतलेले नाही. ’’संजय येनपुरे, अतिरिक्त पोलीस आयुक्त, ठाणे शहर