भारत हा शेतीप्रधान देश म्हणून ओळखला जातो. बहुतेक ठिकाणी शेती हेच उदरनिर्वाहाचे साधन असते. नंतर जोडव्यवसायही सुरू करतात. शेती ही पूर्णपणे पावसावर अवलंबून आहे. पण हा पाऊसच शेतकऱ्याच्या उरावर कधी बसेल याचा नेम नाही. यंदा पावसाने वेळेत हजेरी लावल्याने शेतीच्या कामाला वेळेत सुरुवात झाली होती. मात्र परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या मेहनतीवर पाणी फिरवले. पिके वाया गेल्याने नुकसान तर झालेच पण वर्षभर खायचे काय, अशी परिस्थिती निर्माण केली आहे. या पार्श्वभूमीवर शहापूर, मुरबाड, भिवंडी तालुक्यांतील परिस्थिती जाणून घेतली आहे, ‘लोकमत’चे प्रतिनिधी जनार्दन भेरे,श्याम राऊत, नितीन पंडित यांनी.निसर्गाचा लहरीपणा काय असतो हे सर्वसामान्य नागरिकांपासून शेतकºयांपर्यंत सगळ्यांनी अनुभवले आहे. यंदा पावसाने चांगली हजेरी लावल्यामुळे बळीराजा सुखावला होता. पिकेही मोठ्या प्रमाणात आल्यामुळे शेतकºयाला वाटले नेहमीपेक्षा चार पैसे अधिक गाठीला जमतील आणि दिवाळी आनंदात साजरी करता येईल. मात्र बळीराजाचे हे सुख बहुतेक निसर्गाला पाहावले नाही. चक्रीवादळामुळे, परतीच्या पावसाने ठाण मांडल्यामुळे शेतकºयांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला. या अस्मानी संकटामुळे बळीराजा पार कोलमडून गेला. संपूर्ण भातपीक भिजून गेले. असा भात बाजारात घेऊन गेल्यास कवडीमोल भाव मिळेल, यामुळे आर्थिक संकटाचा डोंगरच शेतकºयांपुढे उभा राहिला. राज्यातील शेतकºयांची दिवाळी मात्र गोड गेली नाही हे मात्र निश्चित.
ठाणे जिल्ह्यातील शहापूर, मुरबाड, भिवंडी अगदी मीरा-भाईंदरमधील भातपिकाचे नुकसान झाले. हातातील पीक गेल्यामुळे खायचे काय, हा प्रश्न शेतकºयांना सतावत आहे. शहापूर तालुक्यात गेल्या चार महिन्यांपासून सतत पडत असलेल्या पावसामुळे पीक परिस्थिती अतिशय भयानक झाली आहे. या संकटातून शेतकºयांना बाहेर काढण्यासाठी राज्य सरकारने तातडीने पंचनामे करून शेतकºयांना मदत करणे गरजेचे आहे. मागील पाच महिन्यांपासून शहापूर तालुक्यात मुसळधार पाऊस पडत असल्याने आधीच पावसाच्या वेगाने भातपिके वाहून गेली तर काही पाण्यात कुजून गेल्याने मोठे नुकसान झाले. साधारण १० दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आणि भातपिकेही कापणीला आल्याने शेतकºयांनी अधिकचे मजूर घेऊन कापणीस सुरुवात केली खरी, मात्र कापणी केलेली भातपिके शेतात, खळ्यात पार बुडून गेली. नुसती बुडून नाही तर पावसात कुजून गेली.
तालुक्यातील दहागाव येथील शेतकरी संजय पवार यांनी तब्बल तीन एकर जागेत या वर्षी भातपिके लावली. कारण उन्हाळ्यात कालव्याच्या पाण्यात त्यांनी भातपीक घेतले नसल्याने आता आपण पावसाळ्यातील पाण्यावर भातपीक घेऊ, या इराद्याने त्यांनी ही लागवड केली. सतत पडणाºया पावसातही भातपिकाने तग धरून सोन्यापरीस चकाकणारे धान्य दाखवायला सुरुवात केल्यामुळे रघुनाथ विशे आनंदित होते. मात्र हा आनंद त्यांच्या चेहºयावर राहिलाच नाही. आनंद त्या पावसात वाहून गेला. आपल्या तीन एकर जागेत चकाकणारे भातपीक लवकर घरी आणण्यासाठी त्यांनी त्याची कापणी केली आणि कापलेली भातपिके पाण्यात बुडाली. आठवडाभराच्या मुसळधार पावसात भाताच्या लोंबीतील दाणा पार विस्कटून गेला. त्या दाण्याचे पीठ झाल्याने आता या शेतकºयाच्या घरात आजमितीला एक किलो धान्यही खायला राहिले नसल्याची अवस्था या शेतकºयाच्या घरची झाली आहे.हे धान्य घरात नेऊन त्याची झोडणी करून येणारी दिवाळी आनंदात साजरी करू, असे मनाशी स्वप्न बाळगले. मात्र सतत पडत असलेल्या मुसळधार पावसाने या स्वप्नावर पाणी फिरवले. वर्षभर कुटुंबाची गुजराण कशी करायची, हा गहन प्रश्न कुटुंबप्रमुख म्हणून त्यांच्यासमोर उभा राहिला आहे.या पावसामुळे भातशेती तर गेलीच पण आता पुढील काळ मात्र त्यांना तांदूळ विकत आणावा लागणार आहे. त्यामुळे आर्थिक फटका तर सहन करावा लागणार तर आहेच, पण तो पौष्टिकपणा या तांदळातून मिळणार नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे.सतत पडत असलेल्या पावसातही माळरानातील भातपिके तग धरून होती. उलट अधिक पावसामुळे ती भरात आली. यावेळी या माळरानात आपल्याला मागील वर्षीपेक्षा अधिक धान्य मिळेल, त्यामुळे त्यातील काही भात विकून दिवाळीसाठी मुले, आईवडील व पत्नी यांना नवीन कपडे घेऊ. या वेळची भाऊबीजही जोरात करू, असे मनसुबे मनाशी बाळगून भातशेतीच्या कापणीस सुरु वात केली. मात्र, दोन एकर जागेतील भातकापणी फुकट गेली. त्यामुळे ३०-४० हजाररुपयांचे नुकसान तर झालेच, पण खाण्यासाठी धान्य आणायचे कुठून, असा प्रश्न निर्माण झाला आहे, अशी खंत नडगाव येथील नरेश साखरपाडा यांनी व्यक्त केली.
दोन दिवस भातकापणी अधिक केली. ऊन मिळाल्यास भाताचे दाणे चांगले होतील, या विचाराने त्यातील काही भाताचे भारे बांधून खळ्यातही नेले पण पावसाने अशी काही सुरुवात केली की, कापलेले सारे भातपीक पाण्यातच तरंगले, तेही आठ दिवस. यामुळे पिकाच्या लोंबीतील दाणा पार काळा पडून तो पिठूळ झाल्याने त्यातील कसदारपणा तर निघून गेलाच, पण या दाण्यामुळे पोटाचे आजारही निर्माण होतील. शिवाय, तो लहान मुलांना खाण्यासाठीही उपयुक्त नाही. आज दोन एकर जमिनीत भातशेती केली. आज सारा उदरनिर्वाह हा शेतीवरच असल्याने जर अशी परिस्थिती असेल तर कुटुंबाने जगायचे कसे, असा प्रश्न साखरपाडा यांच्यापुढे पडला आहे.सरकार यासाठीची भरपाई देईलही, मात्र ती तुटपुंजी असेल. शेवटी वर्षभर अन्नासाठी आम्हालाच जंगजंग पछाडावे लागणार आहे. आज सोन्यासारखी भातपिके हातची जात असल्याचे डोळ्यांनी पाहण्याची वेळ आम्हा शेतकºयांवर आली आहे, असे त्यांनी सांगितले.