ठाणे : भारतीय स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष १५ ऑगस्टपासून सुरू झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर अ. भा. मराठी नाट्यपरिषद, ठाणे शाखेतर्फे ''अमृत भारत राज्यस्तरीय काव्यवाचन / सादरीकरण स्पर्धा'' घेण्यात येणार आहे. भारतीय स्वातंत्र्य चळवळ, क्रांती लढाई, क्रांतिकारकांचे कार्य, जीवन, तत्कालीन सामाजिक परिस्थिती, जनभावना यावर स्वरचित काव्याचे वाचन / सादरीकरण स्पर्धकाला करायचे आहे.
कविता (छंदोबद्ध वा मुक्त छंद), गेय कविता (गीत), शाहिरी कवन (पोवाडा, फटका, कटाव, आदी) वा काव्याचा कुठलाही प्रकार स्पर्धेसाठी पात्र आहे, असे संयोजक नरेंद्र बेडेकर यांनी सांगितले. या स्पर्धेसाठी कलाकारांनी आपल्या सादरीकरणाचे छायाचित्रण हे गुगल ड्राइव्ह, व्हिडिओ ई-मेल किंवा व्हाॅट्सॲपद्वारे पाठवायचे आहे. प्रवेशिका व व्हिडिओ पाठविण्याची अंतिम तारीख २५ सप्टेंबर २०२१ आहे. मराठी सृष्टी डॉट कॉमचे सहकार्य या स्पर्धेला लाभले असून, प्रथम येणाऱ्या स्पर्धकास तीन हजार, द्वितीय दोन हजार, तृतीय एक हजार रुपये अशा रकमेच्या पारितोषिकांसह प्रमाणपत्र तसेच इतर उत्तेजनार्थ प्रमाणपत्रे देण्यात येतील.