प्रज्ञा म्हात्रेठाणे : ठाण्यातील विविध वस्त्यांमधील मुलांनी त्यांना भिडणाऱ्या, त्यांना जाणवलेल्या अनुभवांवर आधारीत उत्स्फुर्त नाटिका सादर करुन आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यात हुंड्याची समस्या, मुलींवरील अत्याचार, सार्वजनिक गणपती उत्सव, विराण हवेलीची सहल, बागेची सफर अशासारख्या विषयांवर त्यांनी नाट्यरुपाने प्रकाश टाकला. निमित्त होते वंचितांच्या रंगमंचाचे.
समता विचार प्रसारक संस्थेतर्फे ठाण्यातील गरीब होतकरू मुलांच्या कालगुणांना वाव मिळण्यासाठी श्रेष्ठ साहित्यिक, नाटककार रत्नाकर मतकरी यांच्या संकल्पनेतून साकारलेला वंचितांचा रंगमंच हा उपक्रम गेली ८ वर्षे चालवला जातो. त्या अंतर्गत यामध्ये सहभागी होणाऱ्या कलाकारांसाठी नाट्य प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले होते. विविध वस्तीतून आलेल्या शंभराहून अधिक मुलांना समजून घेऊन त्यांनी त्यांच्यासाठी नाट्यविषयक विविध खेळांचे आयोजन केले. मुलांनी स्वत: विचार करून ते नाट्य रूपाने कसे व्यक्त करायचे, नवरसांसहित अनेक भावना अभिनयातून कशा व्यक्त करायच्या हे त्यांनी वेगवेगळ्या खेळांतून शिकले. मुलांनी उत्स्फूर्त नाट्याविष्कार सादर केले. इतकेच नव्हे तर त्यांनी या आविष्काराचा आनंद अनुभवला. शिबिराच्या शेवटी मुलांनी व्यक्त केलेल्या अनुभवातून मुलांच्या मनात नाट्यकलेविषयी प्रेम आणि उत्सुकता निर्माण झाल्याचे आणि त्यांचा आत्मविश्वास वाढला. सुप्रसिद्ध कलाकार सुप्रिया मतकरी विनोद, नाट्यजल्लोषच्या संयोजिका हर्षदा बोरकर आणि त्यांचे सहकारी दीप्ती दांडेकर व आदित्य कदम यांनी प्रशिक्षणाची संपूर्ण जबाबदारी अतिशय आपुलकीने हाताळली. अशा प्रकारचे प्रशिक्षण शिबीर प्रत्येक महिन्यात घेण्याचा मानस संस्थेच्या कार्यकर्त्या मीनल उत्तुरकर यांनी जाहीर केला आणि डिसेंबर मध्ये होणार्या नाट्यजल्लोषमधे आता ही मुले दमदारपणे सादरीकरण करतील अशी खात्री व्यक्त केली. दरम्यान, या प्रसंगी संस्थेचा एकलव्य कार्यकर्ता पंकज गुरव आणि संस्थेचे सचिव अजय भोसले यांनी मिळून बनवलेल्या संस्थेच्या samatavichar.org या वेबसाइटचे उद्घाटन पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले.