प्रशांत माने डोंबिवलीसोयीसुविधांच्या अभावामुळे कल्याण-डोंबिवली महापालिका शाळांमधील पटसंख्येला घरघर लागली असताना दुसरीकडे शिक्षणप्रेमींच्या पुढाकारामुळे शाळांना एक प्रकारे नवसंजीवनी मिळत असल्याचे चित्र आहे. येथील पु.भा. भावे विद्यालयाला शिक्षणप्रेमींचा असाच हातभार लागल्याने शाळेचे रूप पालटले आहे.जुनी डोंबिवली परिसरात मराठी माध्यमाची ही शाळा आहे. इयत्ता पहिली ते पाचवीचे वर्ग इथे भरत असले तरी विद्यार्थी पटसंख्या केवळ २४ इतकी आहे. घटती पटसंख्या पाहता ‘नवीन प्रवेश चालू आहेत’ असे आवाहन शाळेच्या प्रवेशद्वारावर केले आहे. दोन शिक्षक येथे कार्यरत आहेत. शाळा मराठी माध्यम असली तरी या ठिकाणी बहुभाषिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत, हे या शाळेचे वैशिष्ट्य आहे. या शाळेलाही सुरक्षारक्षक, शिपाई नाही. दोन वर्ग आहेत. एका वर्गात पहिली ते पाचवीचे विद्यार्थी शिक्षण घेतात, तर बालवाडीसाठी स्वतंत्र वर्ग तयार केला आहे. सोयीसुविधा पुरविण्यात शिक्षण मंडळ प्रशासनाचा नाकर्तेपणा दिसून आला असला तरी शिक्षणप्रेमींच्या सहकार्यातून काही सुविधा शाळेला उपलब्ध झाल्या आहेत. त्यांच्या माध्यमातून या ठिकाणची रंगरंगोटी, संरक्षक भिंत आणि गेट उभारणे, छतावर नवीन पत्रे टाकणे, ही कामे केली आहेत. त्याचबरोबर बालवाडीचा वर्ग खेळणी आणि रंगरंगोटीने आकर्षित केला आहे. विद्यार्थी आणि विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र अशी प्रसाधनगृहेदेखील बांधली. शाळेत राबविल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांमध्येही स्थानिक नागरिकांचा सहभाग मोठ्या प्रमाणावर दिसून येतो. सामाजिक भान ठेवून अशा प्रकारे सहकार्य लाभले तर महापालिका शाळांनादेखील ‘अच्छे दिन’ येतील आणि पटसंख्या वाढीला हातभार लागेल.
शिक्षणप्रेमींच्या हातभाराने शाळेला नवसंजीवनी
By admin | Published: July 08, 2015 10:40 PM