ठाणे : ठाणे महानगरपालिका यांच्यावतीने ठाणे स्मार्ट सिटीच्या माध्यमातून बांधण्यात येणाऱ्या नवीन रेल्वे स्टेशनच्याबाबतीत बुधवारी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विन वैष्णव यांच्या समवेत झालेल्या बैठकीत नवीन ठाणे रेल्वे स्टेशनच्या परिचलन क्षेत्रातील सर्व कामे रेल्वे मंत्रालयाच्यावतीने करण्यात येतील, अशी ग्वाही देण्यात आली. यासाठी लागणारा निधीही रेल्वे मंत्रालय देईल असे रेल्वे मंत्र्यांनी स्पष्ट केले. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि खासदार नरेश म्हस्के यांच्या पुढाकारामुळे महापालिकेचे अंदाजे १८५ कोटी वाचण्यास मदत होणार आहे. दिल्लीत रेल भवन येथे झालेल्या या बैठकीस ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव आणि अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी हे उपस्थित होते. ठाणे येथे मनोरूग्णालयाच्या जागेत ठाणे स्मार्ट सिटीतंर्गत नवीन रेल्वे स्टेशन बांधण्यात येत आहे. यामध्ये रेल्वे परिचलन क्षेत्रामधील ट्रॅक बांधणे, रेल्वे स्टेशन इमारत बांधकाम बांधणे आदी अनुषंगिक कामे रेल्वेकडून तर,परिचलन क्षेत्राच्या बाहेरील डेक, रॅम्प आदी अनुषंगिक कामे स्मार्ट सिटीच्यावतीने करण्यात येणार आहेत. ही कामे जलदगतीने व्हावीत आणि रेल्वे मंत्रालयाच्या स्तरावर तातडीने निर्णय व्हावा. तसेच, परिचलन क्षेत्रामध्ये करण्यात येणारी कामे रेल्वे मंत्रालयाने त्यांच्या निधीमधून करावी यासाठी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या दालनात बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीच्या सुरूवातीस महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी या प्रकल्पाविषयीची पार्श्वभूमी मांडली. या प्रकल्पामुळे ठाणे शहराला कसा फायदा होणार आहे याची माहिती दिली. त्यानंतर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि खासदार नरेश म्हस्के यांनी परिचलन क्षेत्रामध्ये जी कामे करण्यात येणार आहेत, ती सर्व कामे रेल्वे मंत्रालयाने त्यांच्या निधीमधून करण्याची विनंती केली. त्यांनी केलेली विनंती त्वरीत मान्य करून केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेल्वे परिचलन क्षेत्रामध्ये करण्यात येणारी कामे ही रेल्वे मंत्रालय त्यांच्या निधीतून करेल.
या कामासाठी भविष्यात होणारी भाववाढ आणि त्या कामासाठी लागणारा अतिरिक्त निधीही रेल्वे मंत्रालय करेल अशी ग्वाही त्यांनी दिली. त्याचबरोबर परिचलन क्षेत्राच्या बाहेर ठाणे स्मार्ट सिटीतंर्गत करण्यात येणाऱ्या कामासाठी मेट्रो प्रकल्पाचे काम सोडून उर्वरित कामासाठी रेल्वेच्या ना हरकत घेण्याची तरतूदही रद्द करण्यात यावी या खासदारद्वयींची मागणीही रेल्वे मंत्री वैष्णव यांनी मान्य केली.