ठाणे : आपल्यावरील बलात्काराचा आरोप खोटा असून त्याचसंदर्भातील डीएनए अहवालही निगेटिव्ह आला आहे. तरीही, न्यायालयातून जामीन मिळाला नाही आणि नवी मुंबई पोलिसांकडूनही आपल्या सुटकेसाठी प्रयत्न न झाल्याने ठाणे जिल्हा मध्यवर्ती कारागृहात उपोषणाला बसलेल्या हरिश्चंद्र शुक्ला याकैदी शिक्षकाचे बुधवारी पाचव्या दिवशीही कारागृहात उपोषण सुरूच आहे.न्यायालय आणि पोलीस यंत्रणेविरोधात ठाणे कारागृहातच या कैद्याने २ सप्टेंबरपासून उपोषण सुरू केले आहे. त्याआधी ३० आणि ३१ आॅगस्ट रोजी आपण उपोषण करणार असल्याचा इशारा त्याने दिला होता. तो ज्या शाळेत शिक्षक म्हणून नोकरीला होता, त्याच शाळेतील एका विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केल्याचा त्याच्यावर आरोप आहे.याच आरोपाखाली त्याला अटक झाल्यानंतर त्याचा मुंबई उच्च न्यायालयानेही जामीन नाकारला आहे. मात्र, आपल्यावरील आरोप खोटे असल्याचा दावा करून त्याने आपल्याला जामीन मिळत नाही, तोपर्यंत हे उपोषण सुरूच ठेवणार असल्याचे कारागृहातील अधिकाºयांना सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली. ज्या काळात हा प्रकार घडला आहे, त्या वेळी माझे पती त्या शाळेत नव्हे, तर अन्य शाळेला नोकरीला होते, असा दावा या कैद्याची शिक्षिका पत्नी अंजली शुक्ला हिने केला आहे.
ठाणे कारागृहात नवी मुंबईच्या ‘त्या’ शिक्षकाचे उपोषण सुरूच, आरोप बलात्काराचा : डीएनए अहवाल निगेटिव्ह आल्याचा दावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 07, 2017 2:33 AM