ठाणे : नवरात्रोत्सवानिमित्त फुलांचे भाव वाढले असले, तरी कोरोनाचा फटका विक्रीला बसला असल्याचे फुलविक्रेत्यांनी सांगितले. कोरोनामुळे यंदा नवरात्रोत्सव साधेपणाने साजरा होणार असल्याने फुलांच्या मागणीत घट झाली असल्याचे ते म्हणाले.
शनिवारपासून नवरात्र उत्सवास सुरुवात होत आहे. यानिमित्ताने फुलांचे भाव वाढले आहेत. यावेळी फुलांचा माल जास्त येत नसल्याने दुपारी येणारा फुलांचा ट्रक पहाटे ४ वाजता येतो, असे फुलविक्रेते राजेश रावळ यांनी सांगितले. यंदा सार्वजनिक नवरात्रोत्सव साधेपणाने साजरा करणार असल्याने मंडपात दरवर्षी असणारी फुलांची सजावट यंदा मंडळे करणार नाहीत. त्यामुळेही त्यांच्या विक्रीत घट झाल्याचे ते म्हणाले.
गुरुवारी बाजारपेठेत सकाळपासून खरेदी सुरू असली, तरी शुक्रवारी गर्दी होण्याची शक्यता विक्रेत्यांनी वर्तवली आहे. मागणी वाढल्याने दरातही वाढ झाली आहे. काम करून सायंकाळी ग्राहक खरेदीसाठी बाहेर पडत असले, तरी पाऊस आल्यानंतर त्यांची गर्दी ओसरते आणि त्याचा परिणाम विक्रीवर होतो, अशी नाराजी विक्रेत्यांनी व्यक्त केली.
नवरात्रीनिमित्त गजऱ्याच्या फुलांत झाली वाढनवरात्रीनिमित्त महिलावर्ग गजऱ्याची मोठ्या प्रमाणात खरेदी करतात. यंदा, या फुलांच्या भावात वाढ झाली असल्याचे दक्षा नालबेन यांनी सांगितले. ट्रेन बंद असल्याने माल आणायला प्रचंड त्रास होतो. जिथे येऊन जाऊन दीड तास लागत होते, तिथे चार तास फक्त जायलाच लागतात. त्यामुळे याचाही फटका विक्रेत्यांना बसत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
अवघ्या २५ टक्के मूर्तींचे झाले बुकिंग
नवरात्रौत्सवावरही कोरोनाचे सावट आहे. यंदाचा उत्सव साधेपणाने साजरा करण्याचे आदेश असल्याने देवीच्या मूर्तीचे केवळ २५ टक्केच बुकिंग झाले असल्याची खंत मूर्तिकारांनी व्यक्त केली.
गणेशोत्सवानंतर नवरात्रोत्सवाचे पडघम वाजू लागतात. परंतु, दोन्ही उत्सवांवर यंदा कोरोनाचे संकट असल्याने गणेशोत्सवाप्रमाणे हा उत्सवही साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. त्यामुळे दरवर्षीपेक्षा यंदा २५ टक्केच मूर्ती बुक झाल्या आहेत. या उत्सवात घरगुतीपेक्षा सार्वजनिक मंडळे हे प्रामुख्याने मूर्ती बसवत असतात. परंतु, भाविकांनी मूर्तीची उंची कमी केली आहे, तर अनेक भाविक हे बुकिंगला आलेच नसल्याचे निरीक्षण मूर्तिकार सचिन गावकर यांनी नोंदविले. गेल्या वर्षीपर्यंत १२ फुटांपर्यंतच्या मूर्ती बुकिंग होत होत्या. परंतु,यावर्षी चार फुटांपर्यंतचे बंधन असल्याने २ ते ४ फुटांपर्यंतच्या मूर्तीचे बुकिंग झाले आहे. जिथे घरगुती १५ बुकिंग होत होत्या, तिथे तीन ते चार आणि जिथे ४० मूर्ती बुक होत होत्या, तिथे दोन ते तीन मूर्ती बुक केल्या जात आहेत, असे गावकर यांनी सांगितले.