ठाणे : बेकायदा सीडीआर (कॉल्सचा तपशील) प्रकरणात पोलीस चौकशीस टाळाटाळ करणारा नामवंत अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी याच्या वकिलास ठाणे पोलिसांनी शुक्रवारी रात्री अटक केली. पोलिसांनी त्यांच्या कार्यालयाची झडती घेतल्याची माहितीही सूत्रांनी दिली.मोबाइल फोनचे सीडीआर बेकायदा पद्धतीने काढणाऱ्या आरोपींचा पर्दाफाश ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने जानेवारी महिन्यात केला. या प्रकरणी देशातील पहिल्या महिला गुप्तहेर रजनी पंडित आणि काही खासगी गुप्तहेरांसह ११ आरोपींना आतापर्यंत अटक करण्यात आली. काही दिवसांपूर्वी या प्रकरणात अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीचे नाव समोर आले. नवाजुद्दीनचे त्याच्या पत्नीसोबत वैयक्तिक वाद होते. या वादातून त्याने पत्नीच्या मोबाईल फोनचा सीडीआर पोलिसांनी अटक केलेल्या एका आरोपीच्या मदतीने मिळवल्याचा आरोप आहे. पोलिसांनी या प्रकरणी चौकशीसाठी नवाजुद्दीनला नोटीसही बजावली होती. नोटीस बजावून आठ दिवसांपेक्षा जास्त कालावधी उलटला, तरी नवाजुद्दीनने चौकशीसाठी अद्याप ठाणे पोलिसांकडे हजेरी लावलेली नाही. उलटपक्षी ट्विट करून त्याने त्याच्याविरूद्धच्या आरोपांवर संताप व्यक्त केला होता. पोलिसांनी नवाजुद्दीनचा वकील रिझवान सिद्दीकी याच्यासह नवाजुद्दीनच्या पत्नीलाही चौकशीसाठी नोटीस बजावली होती. शुक्रवारी रात्री या प्रकरणी वेगाने घडामोडी झाल्या. ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अॅड. रिझवान सिद्दीकी यांच्या अंधेरी येथील कार्यालयाची झडती घेतली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या झडतीमध्ये पोलिसांनी लॅपटॉप आणि अॅड. सिद्दीकी यांचा मोबाइल फोनही हस्तगत केला.>अनेक अभिनेते गुंतल्याच्या चर्चेला दुजोरासीडीआर प्रकरणामध्ये बॉलिवूडमधील काही अभिनेते आणि अभिनेत्री गुंतले असल्याची चर्चा सुरुवातीपासून होती. अॅड. सिद्दीकी यांच्या अटकेनंतर या चर्चेला दुजोरा मिळत आहे. अॅड. सिद्दीकी हे चित्रपटसृष्टीतील अनेक नामवंत अभिनेत्यांचे वकील आहेत. त्यांच्या चौकशीतून नवाजुद्दीनप्रमाणे आणखी कुणाकुणाची नावे समोर येतात, हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल.
नवाजुद्दीन सिद्दीकीच्या वकिलास अटक, लॅपटॉप, मोबाइल फोन हस्तगत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2018 6:28 AM