लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: रस्त्यावरील खड्ड्यांमुळे ठाणे शहर आणि परिसरात गेल्या काही दिवसांपासून प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. या वाहतूक कोंडीच्या त्रासाला ठाणेकरांना सामोरे जावे लागत आहे. या रस्त्यांच्या दुरु स्तीची जबाबदारी राज्य रस्ते विकास महामंडळाची (एमएसआरडीसी) असल्याने त्यांनी तत्काळ रस्त्यांची दुरु स्ती करावी. जोपर्यंत रस्त्यांची दुरु स्ती होत नाही, तोपर्यंत शहरातून होणारी अवजड वाहतूक थांबवावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे. या मार्गावरील अवजड वाहतूकही रस्ते दुरु स्ती होईपर्यंत थांबवावी. येत्या आठ दिवसात याबाबत योग्य निर्णय न घेतल्यास भुमिका न घेतल्यास राष्ट्रवादी काँग्रेस आक्र मक भूमिका घेऊन ठाण्यात येणारी अवजड वाहतूक बंद पाडेल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहराध्यक्ष माजी खासदार आनंद परांजपे आणि ठामपा गटनेते नजीब मुल्ला यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना दिला आहे.
रस्त्यावरील खड्ड्यांमुळे गेल्या काही दिवसांपासून ठाणे शहरातील वाहतूक कोंडीमध्ये प्रचंड वाढ होत आहे. त्याविरोधात ठाणेकरांमध्ये आक्रोश आहे. या आक्रोशाला राष्ट्रवादी काँग्रेसने वाचा फोडली आहे. या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहराध्यक्ष परांजपे आणि ठाणे महापालिकेचे गटनेते नजीब मुल्ला यांनी पालकमंत्र्यांना निवेदन दिले आहे.
या संदर्भात परांजपे यांनी ठाणे शहरातील रस्त्यांची निगा राखण्याची जबाबदारी एमएसआरडीसी कडून पार पाडली जात नाही. महापौर रात्रीच्या अंधारात गणेशोत्सवाचे विसर्जन होत असताना साचलेल्या पाण्यामध्ये डांबर टाकून खड्डे बुजवायचा प्रयत्न करीत होते. राष्ट्रवादीचे गटनेते नजीब मुल्ला यांनी अत्यंत परखडपणे आपली भूमिका मांडली. अनेक वर्षांपासून कोस्टल रोड, फॉरेस्ट रोड, मोगरपाडा येथील पूल ही कामे ठामपा आणि एमएसआरडीसीमधील समन्वयाअभावी रखडली आहेत. जर एमएसआरडीसी, एमएमआरडीए, ठामपा आणि पालकमंत्री यांच्या स्तरावर निर्णय झाले असते तर अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले हे प्रकल्प मार्गी लागले असते. हे मुल्ला यांनी नमुद केले.
ठाण्याला आज पर्यायी रस्त्याची गरज आहे. कोपरी पूल तयार आहे; त्याच्या दर्जाबाबत ठाणेकरांना देणेघेणे नाही. जर हा पूल तयार झाला आहे तर तो ठाणेकरांसाठी खुला करायला हवा. ठाण्यात मेट्रोची कामे सुरु आहे. ठाण्यातील उड्डाणपुलांवर खड्डे आहेत. हे उड्डाणपुल एमएसआरडीसीचे आहेत. ठामपा आणि एमएसआरडीसीमध्ये ताळमेळ नाही. ते एकमेकांकडे बोटे दाखवतात. त्यामुळे ठाणेकरांचे हाल होत आहेत. हाय-वे ची जबाबदारी सआरडीसीकडे आणि अंतर्गत रस्त्यांची जबाबदारी ठामपाकडे आहे. एमएसआरडीसी खाते शिवसेनेकडे आहे आणि ठामपातही शिवसेनेची सत्ता आहे. ठामपात सेनेला स्पष्ट बहुमत आहे. राष्ट्रवादीची गरज नाही, असे महापौर म्हस्के यांनी म्हटले होते. त्यामुळे या खड्ड्यांची जबाबदारीही शिवसेनेचीच आहे. कामाचा दर्जा तपासणे ही जबाबदारी शिवसेनेची आहे. त्यामुळे ठाणेकरांना खड्डेमुक्त आणि वाहतूक कोंडीतून मुक्तता देण्याची जबाबदारी शिवसेनेची आहे.
पालकमंत्र्यांनी स्वत: लक्ष घालून ठाणेकरांची वाहतूक कोंडीतून मुक्तता करावी; अन्यथा, मुलुंड टोल नाका, खारीगावा टोल नाका आणि गायमुख या तिन्ही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते रस्त्यावर उतरु न ठाण्यात येणारी अवजड वाहनांची वाहतूक रोखून धरेल. ठाण्यात एकही अवजड वाहन येऊ देणार नाही, असा इशारा परांजपे यानी दिला.