ठाणे : भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी इस्लाम धर्माचे संस्थापक मोहम्मद पैगंबर यांच्याविरोधात आक्षेपार्ह विधान केले आहे. त्यानिषेधार्थ राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. नुपूर शर्मा यांना तत्काळ अटक करावी, या मागणीसाठी गृहनिर्माण मंत्री ना.डाॅ.जितेंद्र आव्हाड आणि शहराध्यक्ष आनंद परांजपे यांच्या मार्गदर्शनाखाली कळवा-मुंब्रा युवक अध्यक्ष तथा मा. विरोधीपक्ष नेते शानू पठाण यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने करून दारूल फलाह मशिदीसमोर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी पठाण यांनी, महामानव आणि प्रेषीतांचा अवमान करणाऱ्यांवर कडक कारवाई करणेसाठी महाराष्ट्र सरकारने विशेष कायदा करावा; नुपूर शर्मा यांना तत्काळ अटक करावी, अशी मागणी केली.
भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्या नूपूर शर्मा यांच्या विरोधात मुंबई, भिवंडी तसेच मुंब्रा येथे एफआयर दाखल करण्यात आला आहे. नूपूर शर्मा यांनी मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य टीव्ही वाहिनीवरील चर्चेत केलं होतं. नूपूर शर्मा यांच्या विरोधात कलम भादंविच्या २९५ अ, १५३अ आणि ५०५ ब अंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे. मात्र, त्यांना अद्याप अटक झालेली नाही. त्यांना अटक करावी, या मागणीसाठी मंगळवारी शानू पठाण यांच्या नेतृत्वाखाली शाकीर शेख, मैसर शेख, साकिब दाते, मर्जिया पठाण, नाजीम बुबेरे यांच्या उपस्थितीत जोरदार आंदोलन करण्यात आले. मुंब्रा ,कौसा भागातील शेकडो नागरिक मोर्चाने आंदोलनस्थळी दाखल झाले. या आंदोलकांनी दारूल फलाह मशिदीसमोरच रस्त्यावर ठाण मांडून रास्ता रोको करीत केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी केली. नुपूर शर्मा यांना अटक झालीच पाहिजे, मानवतेचे शत्रू कोण; भाजपशिवाय दुसरे कोण, नुपूर शर्मा मुर्दाबाद अशा घोषणा आंदोलकांनी दिल्या. तसेच शर्मा यांच्या प्रतिमेला जोड्यांचा मारही देण्यात आला. रास्ता रोको करणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले.दरम्यान, यावेळी शानू पठाण यांनी केंद्रातील भाजप सरकारवर जोरदार टीका केली. "आज सामान्य भारतीयांना पोट भरण्याची चिंता आहे. महागाई गगनाला भिडली आहे. अर्थव्यवस्था धोक्यात आलेली आहे.
भारताची वाटचाल श्रीलंकेच्या दिशेने सुरू आहे. या सर्वांवरून लक्ष हटविण्यासाठी धर्माचे कार्ड वापरले जात आहे. मंदिर, मस्जिद असे वाद निर्माण करून जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण, भारतीय जनता सुजाण आहे. या समाजविरोधी भाजप धोरणांना जनता 2024 मध्ये चोख उत्तर देणार आहे. नुपूर शर्मा यांनी जे विधान केले आहे ते विधान जाणीवपूर्वक आणि भाजपच्या नीतीधोरणानुसारच केले आहे. त्याचा निषेध करण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले. नुपूर शर्मा यांच्यावर केवळ गुन्हा दाखल करून चालणार नाही. त्यांना तत्काळ अटक करण्यात आली पाहिजे. तसेच, कोणत्याही धर्माच्या प्रेषित आणि महामानवांच्या विरोधात आक्षेपार्ह विधान करणार्यांवर कडक कारवाई करण्यासाठी नवीन कायदा करण्यात यावा, अशी मागणी यावेळी मा. विरोधी नेते शानू पठाण यांनी केली.