कल्याण - फसव्या व अपयशस्वी भाजपा सरकारच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने कल्याण तहसील कार्यालयावर शनिवारी (20 ऑक्टोबर) हल्लाबोल मोर्चा काढला. यावेळी सरकारच्या निषेधार्थ घोषणाबाजी करण्यात आली.
शिवाजी चौकात शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन हल्लाबोल मोर्चाला सुरुवात झाली. राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव, सरचिटणीस सुभाष पिसाळ, जिल्हाध्यक्ष रमेश हनुमंते यांच्यासह युवा नेते महेश तपासे, राजेश शिंदे, दत्ता वङो, गुलाब वङो, जानू वाघमारे, प्रल्हाद भिल्लारे, सारीका जाधव सहभागी झाले होते. महंमद अली चौकात मोर्चेकऱ्यांनी ठिय्या दिला. सरकारने जनहिताच्या विरोधात निर्णय घेऊन सगळा गोंधळ घालून ठेवला असल्याने सबळ वाद्य वाजविणारे गोंधळी मोर्चात आणले होते. या सबळ वाद्यावर सरकारच्या नाकर्तेपणाचा निषेधार्थ गोंधळ घालण्यात आला. त्यामुळे हा एक प्रकारे गोंधळी मोर्चा सगळ्य़ांचे लक्ष वेधून घेणारा ठरला.
भाजपा सरकारने दिलेल्या आश्वासनाची पूर्तता केली नाही. यूपीए सरकारच्या काळात स्वस्त असलेला जीवनावश्यक गॅस सिलिंडर हा महागला. त्यामुळे येत्या लोकसभा व विधानसभा निवडणूकीत भाजपाचे सरकार उलथवून लावा असे आवाहन पिसाळ यांनी केले. तर उपाध्यक्ष हिंदूराव यांनी सांगितले की, भाजपा सरकार जातीयवादी आहे. त्याच जातीयवादी सरकारच्या मांडीला मांडी लावून रामदास आठवले बसले आहेत. सत्तेत सहभागी होऊन मंत्रीपद भोगत आहेत. समाजापेक्षा त्याना मंत्री पदाची जास्त काळजी आहे. त्यामुळे येत्या निवडणूकीत दलित समाजाने भाजपाला चांगला धडा शिकविला पाहिजे असे आवाहन केले. मोर्चातील शिष्टमंडळाने कल्याण तहसीलदार अमित सानप यांना सरकारच्या निषेधार्थ निवेदन दिले. राष्ट्रवादीचा भावना सरकार दरबारी पोहचविल्या जातील असे आश्वासन सानप यांनी शिष्टमंडळास दिले.