ठाणे - कर्नाटकच्या निवडणुका संपल्यानंतर पेट्रोलच्या दरात मोठयाप्रमाणात वाढ करण्यात आलेली आहे. मंगळवारी सुमारे 85 रुपये पैसे पेट्रोलचा तर 73 रुपये डिझेलचा दर झाला आहे. याचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांच्या नेतृत्वाखाली ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अनोखे ‘तिरडी आंदोलन’ केले. तिरडीवर दुचाकीला झोपवून चक्क भाजप सरकारचे मडके फोडले. कर्नाटकमधील निवडणुकीनंतर सुरु असलेली इंधन दरवाढ मंगळवारीही कायम आहे. मंगळवारी मुंबईत पेट्रोलच्या किमतीने उच्चांक गाठला असून पेट्रोलने लिटरमागे 84. 73 रुपयांचा आकडा गाठला. तर डिझलेने लिटरमागे 72. 53 रुपयांचा आकडा गाठला आहे. पेट्रोल व डिझेल महागल्याने महागाई देखील वाढणार आहे. तर दुसरीकडे पेट्रोल- डिझेल दरवाढीवरुन राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक होत भाजप सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत हे अनोखे आंदोलन केले. यावेळी तिरडीवर दुचाकी ठेवून वाहनांना अशीच श्रद्धांजली अर्पण करावी लागेल, असे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी नमूद केले. तसेच, या ठिकाणी आणलेले मडके हे मोदी सरकारचे मडके असल्याचे सांगून कार्यकर्त्यांनी हे मडके फोडले. या आंदोलनात नगरसेवक सुहास देसाई, महेश साळवी, अशरफपठाण(शानु), अनुसूचित सेलचे अध्यक्ष कैलास हावळे, कार्याध्यक्ष रमेश दोडके, ओबीसी सेलचे अध्यक्ष राज राजापूरकर, रामदास खोसे, बाळकृष्ण कामत, युवती अध्यक्षा प्रियांका सोनार, नितीन पाटील, विजय भामरे, सरचिटणीस प्रभाकर सावंत, समीर पेंढारे ,निलेश कदम, रत्नेश दुबे, कुलदीप तिवारी, हेमंत वाणी, दिलीप नाईक, तुळशीराम म्हात्रे,अरविंद मोरे,शरद कोळी,महेंद्र पवार,मयूर सारंग,राणी देसाई, सुमित गुप्ता, किशोर चव्हाण, बाळू नागरे, सचिन पंधारे, सुभाष आंग्रे, समीर नेटके, विशांत गायकवाड,सुधीर शिरसाठ,शिपून बेहरा आदी कार्यकर्ते मोठया संख्येने सहभागी झाले होते. यावेळी माजी खासदार तथा राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी सांगितले की, सबंध देशाचा विचार केल्यास राज्यात इंधनावर सर्वाधिक कर आकारले जात आहेत. आज महागाईने जनता मेटाकुटीला आलेली असतानाही अशी दरवाढ केली जात असल्याने गरीबांना जगावे कसे असा प्रश्न पडला आहे. 13 मे रोजी 82.48 रुपये दर होते. 14 मे रोजी या दरात 17 पैशांची वाढ झाली 15 मे रोजी 14 पैसे, 16 मे रोजी 15 पैसे, 17 मे रोजी 22 पैसे, 18 मे रोजी 29 पैसे, 19 मे रोजी 30 पैसे तर 20 मे रोजी तब्बल 32 पैशांची वाढ झाली. तर मंगळवारी 29 पैशांनी वाढ झाली आहे. म्हणजेच गेल्या नऊ दिवसांमध्ये पेट्रोलच्या दरात दोन रुपयांची वाढ झाली आहे. ही दरवाढ करुन सरकारला गरीबांना मारायचेच आहे. त्यामुळेच सन 2019 मध्ये या सरकारला आता जनताच मारेल, असा विश्वासही आनंद परांजपे यांनी व्यक्त केला.
इंधन दरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादीचे तिरडी आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2018 2:31 PM