Maharashtra Politics: आताच्या घडीला राज्यातील राजकारण अनेकविध मुद्द्यांवरून तापलेले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी जितेंद्र आव्हाड यांनी आपला राजीनामा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे दिला आहे. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी जितेंद्र आव्हाड यांची भेट घेतली. यावेळी मीडियाशी बोलताना मध्यवधी निवडणुकांबाबत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलेला दावा अजित पवारांनी फेटाळून लावला.
शिवसेना खासदार गजानन कीर्तिकर यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर कीर्तिकर यांचे पुत्र अमोल कीर्तिकर यांनी संजय राऊत यांची भेट घेत आपण ठाकरे गटासोबत असल्याचे स्पष्ट केले. यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे बोलतात, ते बरोबर आहे. राज्यात मध्यावधी निवडणुका लागणार असून, याची तयारी दिल्लीत सुरू झाल्याचा दावा केला. यासंदर्भात अजित पवार यांना प्रश्न विचारण्यात आला होता.
संजय राऊतांनी मध्यावधी निवडणुकांबाबत कोणत्या आधारावर विधान केले?
राज्यात मध्यावधी निवडणुका लागण्यासारखी सध्या तरी परिस्थिती दिसत नाही. कारण या सरकारला १४५ पेक्षा जास्त आमदारांचा पाठिंबा आहे. राज्यात कुणाचेही सरकार असले तरी त्या सरकारच्या पाठिशी १४५ आमदारांचा पाठिंबा असेपर्यंत सरकारला कोणत्याही प्रकारचा धोका नसतो. संजय राऊतांना याबाबत नंतर जरुर विचारणार आहे. मध्यावधी निवडणुकीबाबत विधान करण्यात आले आहे. त्या पाठीमागचे नेमके कारण काय? असा प्रश्न आपण संजय राऊत यांना विचारु, असे अजित पवार यांनी स्पष्टपणे सांगितले.
दरम्यान, अजित पवारांनी मध्यावधी निवडणुकांचा दावा फेटाळल्यानंतर महाविकास आघाडीत मतभेद असल्याचे पुन्हा एकदा दिसून आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. तसेच जितेंद्र आव्हाड यांनी राजीनाम्याबाबतचं ट्विट मागे घ्यावे. जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांमुळे नाराज होऊन राजीनामा दिला आहे. कुठेही विनयभंग झाल्याचे दिसत नाही. मुख्यमंत्र्यांनी याबाबत सांगायला हवे होते, असे अजित पवार म्हणाले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"