ठाणे : येत्या काही दिवसात ठाणे जिल्ह्यात आणखी भूकंप होणार असल्याचा दावा करीत शिंदे गटाचे ठाणे जिल्हा प्रमुख नरेश म्हस्के यांनी जिल्ह्यातील राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसचे अनेक नगरसेवक देखील आमच्या सोबत येतील असा दावा केला आहे. त्यामुळे ठाकरे यांना धक्के देताना आता शिंदे गट राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसला देखील मोठे धक्के देण्याच्याच तयारीत असल्याचे यावरुन दिसत आहे.
शनिवारी ठाण्यात युवासेनेचे विस्तारक नितीन लांडगे यांनी देखील शिंदे गटात सामील होण्याचा निर्णय घेतला. याची माहिती देण्यासाठी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. दोन दिवसापूर्वी आदीत्य ठाकरे यांच्या स्वागतासाठी नितीन लांडगे यांनी हजेरी लावली होती. त्यानंतर शनिवारी त्यांनी आपल्या सर्व पदांचा राजीनामा देत असल्याचे जाहीर करीत शिंदे गटात सामील होत असल्याचे जाहीर केले आहे. लांडगे यांनी युवा सेनेचे काम केले आहे.
सुरुवातीला समज गैरसमज होत होते. मात्र आता हे गैरसमज दूर होत आहेत. त्यानुसार ते शिंदे गटात सामील होत असल्याचेही त्यांनी सांगितले. आणखी आमदार, खासदार शिंदे गटाला पाठिंबा देत असल्याचेही त्यांनी सांगितले. उद्धव ठाकरे यांच्या गटातील खासदार, आमदार, नगरसेवक पदाधिकारी हे शिंदे गटात सहभागी होत असताना आता येत्या काळात जिल्ह्यातील राष्ट्रवादी, कॉंग्रेसचे अनेक नगरसेवक शिंदे गटात सामील होतील असा दावा केल्याने यापुढील धक्के या दोन पक्षांना बसणार असल्याचेच दिसत आहे.
युवासेनेचा राजीनामा देत एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील कार्य करण्याचा निर्णय घेतला, असल्याचे लांडगे यांनी सांगितले. तरूण आणि रोजगारांचा प्रश्न आहे. त्यामुळे खासदार श्रीकांत शिंदे यांच्याशी चर्चा झाल्यानंतर ठाण्याची प्रगती आणि तरुणांच्या समस्या सुटत असतील तर त्यानुसार त्यांच्या सोबत जाण्याचा निर्णय घेतला असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. आधी गेलो असतो, मात्र त्यांचे व्हिजन आणि विचार पटल्यानेच मी शिंदे गटात सामील झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ठाणे जिल्ह्यातील युवा सेनेचे पदाधिकारी राजीनामा देत आहेत, त्यानंतर आता संपूर्ण राज्यात युवा सेनेचा दौरा केला जाणार असल्याची माहिती यावेळी पूर्वेश सरनाईक यांनी दिली.