ठाणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबईतील बैठकीत आमदार जितेंद्र आव्हाड यांचा ठाण्याचा पठ्ठ्या असा उल्लेख केला होता. त्या उद्गारालेल्या आमदार आव्हाड यांनी बॅनरबाजी करत उत्तर दिले. ठाण्याचा पठ्ठ्या साहेबांशी निष्ठावान आहे, होता आणि मरे स्तोवर राहील असे म्हटले आहे. तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा तोच पावसात भिजून भाषण करतानाचा फोटो बॅनरवर लावण्यात आला आहे. कळव्यातील त्या बॅनरने ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बॅनर युद्ध सुरू झाल्याचे दिसत आहे.
अजित पवार यांनी रविवारी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर सोमवारी आव्हाड यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार असे बॅनर लावले होते. त्यातच अजित पवार यांचे ठाण्यातील कट्टर समर्थक असलेले नजीब मुल्ला यांच्या समर्थकांनी आव्हाड आणि जयंत पाटील यांच्याविरोधात निर्दशन केले. तसेच त्या दोघांचा बंटी बबली उल्लेख करून त्याचे फोटो पायदळी तुडवले होते. त्यानंतर आव्हाड यांच्या मतदार संघात अजित पवारांना शुभेच्छा देणारे बॅनर मुल्ला समर्थकांनी लावले. तर अजित पवार यांनी मुंबईतील पहिल्या जाहीर बैठकीत आव्हाड यांचा ठाण्याचा पठ्ठ्या असे म्हणत त्यांना चिमटा काढला. मात्र आव्हाडांनी त्याबाबत प्रतिक्रिया न देता, बॅनर लावत उत्तर दिले. ठाण्याचा पठ्ठ्या हा निष्ठावान आहे असे म्हणून दादांना डीवचण्याचा प्रयत्न केला आहे. त्याला आता दादा समर्थक काय उत्तर देणार हेच पाहावे लागणार आहे. तसेच या बॅनरने आता ठाण्यात बॅनर युद्ध पेटते की काय अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.