लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : छत्रपती शिवाजी महाराज यांनी सुरतेवर स्वारी केली होती. या स्वारीत सुरतकडून मोठी लूट करून स्वराज्य उभे केले. त्याचा बदला आता घेतला जात आहे. या बदल्याचा एक भाग म्हणूनच मुंबईतील हिरे बाजार सुरतला नेण्यात आला आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस जितेंद्र आव्हाड यांनी केली. मुंबईतील हिरे बाजार सुरतला स्थलांतरित करण्यात आला आहे. केवळ हिरे बाजारच नव्हे तर अनेक बड्या संस्था आणि मुंबईत येऊ घातलेले उद्योग गुजरातला पळविण्यात येत आहेत. या मागील मूळ कारण छत्रपती शिवाजी महाराज यांनी सुरतेवर केलेली स्वारी हेच आहे, असे ते म्हणाले.
पंतप्रधानांची भेट घेऊन मराठा आरक्षण द्या
मराठा समाजाला आरक्षण देण्याचे काम मुख्यमंत्री आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी करू शकतात. त्याकरिता २८८ आमदारांना घेऊन जाऊन पंतप्रधानांची भेट घेऊन हा प्रश्न सोडवता येऊ शकतो, असे आव्हाड म्हणाले.
त्यांचे जीव वाचवा
कतारमध्ये आठ माजी नौसैनिकांना इस्रायलसाठी हेरगिरी करण्याच्या आरोपावरून फाशी दिली जाणार आहे. इस्रायलची मोसाद गुप्तहेर संघटना ही सर्वोत्तम संघटना आहे. अशा स्थितीत भारतीय हेरगिरी करतील, हे अनाकलनीय आहे. आपला आंतरराष्ट्रीय पातळीवरील दबदबा आहे, अशी आवई उठविणाऱ्यांनी त्या आठ जणांचे जीव वाचवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असे आवाहन त्यांनी केले.