ठाणे : मुंब्रा-कळवा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड यांना एक लाख नऊ हजार २८३ मते मिळाली, तर शिवसेनेच्या उमेदवार दीपाली सय्यद यांना ३३ हजार ६४४ मते मिळाली. आव्हाड यांनी सय्यद यांचा तब्बल ७५ हजार ६३९ मतांनी दणदणीत पराभव केला. ‘आप’चे उमेदवार अबू अल्तमश फैजी यांना ३० हजार मते मिळाली. त्यामुळे आव्हाडांच्या एक लाख मताधिक्य मिळवण्याच्या स्वप्नाला धक्का बसला.
मुंब्रा-कळवा मतदारसंघातून ११ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. परंतु, खरी लढत ही राष्ट्रवादीचे आव्हाड आणि शिवसेनेच्या सय्यद यांच्यात होती. मात्र, ऐन वेळेस एमआयएमने आपचे उमेदवार अबू अल्तमश फैजी यांना साथ दिल्याने या निवडणुकीची रंगत वाढली होती. गुरुवारी मतमोजणीला सुरुवात झाली, तेव्हा पहिल्या फेरीपासून आव्हाड आघाडीवर राहिले. नवव्या फेरीअखेर निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाल्याने सय्यद यांनी मतमोजणीकेंद्रातून काढता पाय घेतला. सुरुवातीला ईव्हीएम मशीनबाबत आक्षेप घेण्यात आले होते.
अपेक्षेप्रमाणे या मतदारसंघातून राष्ट्रवादीचे विद्यमान आ. आव्हाड यांनी सलग तिसऱ्यांदा विजय प्राप्त केला. शिवसेनेच्या सय्यद यांचा त्यांनी ७५ हजार ६३९ मतांनी पराभव केला. आव्हाड यांना एक लाख नऊ हजार २८३, तर सय्यद यांना ३३ हजार ६४४ मते मिळाली. आपचे उमेदवार अबू अल्तमश फैजी यांना ३० हजार ५२० मते मिळाली. सय्यद यांना ऐनवेळी उमेदवारी देण्याची सेनेची खेळी फसली आहे. आव्हाड यांनी मागील १० वर्षांत केलेल्या विकासकामांना मते देऊन मतदारांनी त्यांना विजयी केले. मागील निवडणुकीतही शिवसेनेने त्यांच्याविरोधात व्यूहरचना आखली होती. परंतु, ती यशस्वी झाली नाही. आव्हाड यांना मागील निवडणुकीत ८६ हजार ५३३ मते मिळाली होती, तर शिवसेनेच्या उमेदवाराला ३८ हजार ८५० मते मिळाली होती. त्या तुलनेत यंदा आव्हाड यांच्या मतांमध्ये २२ हजार ७५० मतांची वाढ झाली.
विजय मिळणारच होता; परंतु आता जबाबदारी वाढली आहे. आता पुढील पाच वर्षांत कामांवर लक्ष द्यायचे आहे. प्रचारात जे बोललो, तेच काम केले. मतदात्यांचे आभार मानतो. त्यांनी केलेल्या मेहनतीमुळेच हे शक्य झाले आहे. उदयनराजेंचा झालेला पराभव हा माझ्यासाठी अधिक आनंद देणारा आहे. शरद पवारांच्या पाठीत खंजीर खुपसला, त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागले आहेत. साताराकरांचे मनापासून आभार मानतो. आता विचारधारांची लढाई होणार आहे. ३७० च्या मुद्द्यावर विधानसभा निवडणुका जिंकता येत नाहीत, हे जनतेने दाखवून दिले.- जितेंद्र आव्हाड, कळवा-मुंब्रा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे विजयी उमेदवार