ठाणे - पळपुटे कोण? या सामनामधील लेखावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शिवसेनेला खडे बोल सुनावले आहेत. शरद पवार हे राजकारणातले भीष्म आहेत. कारण गेली ५० वर्षांपेक्षा जास्त काळ शरद पवार यांच्या भोवतीच फक्त महाराष्ट्र नाही तर देशाचे राजकारण फिरत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री असतील, विरोधक असतील, बाळासाहेबांनंतरची पिढी असेल सर्वच जण शरद पवारांवर टीका करत आहेत, असा टोला आव्हाड यांनी लगावला.शिवसेनेवर टीका करताना आव्हाड म्हणाले की, ''इतिहास काढायचा झाला तर आम्हाला काढतां येतो १९७७ चा इतिहास काढला तर सर्वांनाच त्रास होईल, पण जखमेवरची खपली काढायची नसते. इतिहासाचे दाखले द्यायचे झाले तर अनेक रक्तवाहिन्या भळा भळा वाहतील. स्वाभिमानाच्या गोष्टी कोणीही करायच्या नसतात शरद पवारांचा स्वाभिमान इंदिरा गांधी, मुरली देवरा, मनोहर जोशी, सुधीर जोशी यांना माहिती होता.'' यावेळी आरक्षणाच्या मुद्द्यावरून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यावरही टीका केली. ''नितीन गडकरी सारखे आरक्षणाबद्दल का बोलत आहेत. त्यामागे नेमकं काय आहे हे माहित नाही, पण देशात आरक्षण नसावे हा आर एस एस चा अजेंडा आहे. डॉक्टर बाळासाहेब आंबेडकर, नामदेव ढसाळ यांच्या सारख्यांवर बाप दादांची पुण्यायी नव्हती. कारण जेव्हा तुम्ही शिकत होता तेव्हा आमचे बाप-दादा गुरंढोर राखत होते, मैला उचलत होते. आम्हाला म्हणजे मागासवर्गीय समाजाला अक्षर ओळख व्हायला ५ हजार वर्षे लागली. गेली कित्येक वर्षे देशांतील ८० टक्के मागासवर्गीय समाज गाव कुसा बाहेर ठेवला गेला होता. याचा विचार कधी तरी करा, अशा शब्दात आमदार जिंतेद्र आव्हाड यांनी नितीन गडकरींच्या आरक्षण मुद्दयांवर सडकून टीका केली आहे.
शरद पवारांभोवतीच फिरते राज्य आणि देशाचे राजकारण - जितेंद्र आव्हाड
By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2019 2:23 PM