गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी महागाईवरून बोलताना केंद्र सरकारला उपरोधिक टोला लगावला आहे. "अमेरिकेने हवेतून पोट भरणारं मशीन शोधलं असून ही मशीन लवकरच भारतातही लॉन्च होणार आहे. त्यामुळे महागाई कितीही वाढली, तरी काळजी करू नका," असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.सध्या पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज वाढत चालले आहेत. डिझेलचा दर १०० रुपये, तर पेट्रोलचा दर तब्बल १२० रुपये प्रति लिटरच्या घरात जाऊन पोहोचला आहे. तर घरगुती गॅस सिलेंडरचे दरही गगनाला भिडले आहेत. महागाईच्या या भडक्यामुळे सर्वसामान्य नागरिक अक्षरशः होरपळून निघाला आहे . याबाबत अंबरनाथमध्ये आलेले राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना विचारले असता, त्यांनी त्यांच्या नेहमीच्या शैलीत सरकारला उपरोधिक टोला लगावला.
"अमेरिकेत सध्या हवेतून पोट भरणारं मशिन विकसित करण्यात आली आहे. लवकरच ही मशीन भारतातही लॉन्च होणार आहे. त्यामुळे महागाई कितीही वाढली, पेट्रोल अगदी अडीचशे-तीनशे रुपये लिटर जरी झाले, तरी यापुढे काळजी करू नका, हवेतून पोट भरणारी मशीन मागवा आणि निश्चिंत व्हा," असा उपरोधिक टोला गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केंद्र सरकारला लगावला.
शर्यतीचा बैल आव्हाडांच्या ताफ्यातील पोलीस गाडीवर धडकलाअंबरनाथच्या ग्रामीण भागातील बहनोली गावात आज गुढीपाडव्यानिमित्त बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. या बैलगाडा शर्यतीसाठी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आले होते. त्यांच्या गाडीच्या ताफ्यातील पोलीस निरीक्षकाच्या गाडीवर शर्यतीचा बैल थेट धडकल्याने अपघात घडला. सुदैवाने या अपघातात गाडीत बसलेल्या पोलीस अधिकारी यांना कोणतीही दुखापत झाली नाही, तर बैलाला किरकोळ दुखापत झाली आहे.