ठाणे : लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्ष अध्यक्ष, खासदार शरद पवार यांनी ठाणे जिल्ह्यातील १८ विधानसभांवर आता लक्ष केंद्रित केले आहे. त्यासाठी शनिवारी मुंबई येथील कार्यालयात ते आढावा बैठक घेणार असून लोकसभेतील पराभवावर कारणमीमांसा करण्यासह आगामी विधानसभेच्या मोर्चेबांधणीबाबत पदाधिकाऱ्यांची शाळा घेणार आहेत. या वृत्तास पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव यांनी दुजोरा दिला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसची ठाणे जिल्ह्यातील कामगिरी सुधारण्यासाठी पवार यांनी आता स्वत: लक्ष देण्याचे ठरवले आहे. यास अनुसरून त्यांनी मंगळवारी हिंदुराव यांच्याकडून जिल्ह्यातील विधानसभानिहाय पक्षाच्या कामकाजाची, राजकीय स्थितीची माहिती जाणून घेतली. त्यानंतर, त्यांनी शनिवारी आढावा बैठक घेऊन त्यात सर्वांची झाडाझडती घेत त्यांना आगामी विधानसभा निवडणुकीच्या कामांची जबाबदारी दिली जाणार आहे. लोकसभा निवडणुकीत पक्षाने ठाणे व कल्याण जागा लढवल्या आहेत. त्यांचाही समाचार घेतला जाणार आहे.जिल्ह्यातील १८ मतदारसंघांवर लक्षसध्या ठाणे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे चार आमदार आहेत. मात्र, या लोकसभा निवडणुकीत कळवा-मुंब्रा वगळता उल्हासनगर, ऐरोली आणि शहापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची पीछेहाट झालेली आहे. भिवंडी लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवारालाही पराभव पत्करावा लागला आहे. यामुळे पवार यांनी येथे लक्ष केंद्रित केले आहे.यासाठी शनिवारी आढावा बैठकीत जिल्हा कार्यकारिणीची झाडाझडती घेतली जाणार आहे. यानुसार, जिल्ह्यात मोठे यश मिळवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रयत्न केले जाणार आहेत. यासाठी पक्षाकडून करण्यात येणाºया उपाययोजनांसह प्राथमिक चर्चेवर या बैठकीत भर दिला जाणार असल्याचे हिंदुराव यांनी सांगितले.