ठाणे : मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी उपोषण सुरू केले आहे. त्यांना पाठिंबा देण्यासाठी ठाण्यातही मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ साखळी उपोषण सुरू केले आहे. या उपोषणाला राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भेट दिली. मात्र या ठिकाणी कोणीही आमदार किंवा खासदाराने स्टेजवर जाऊ नये अशी भूमिका काही आंदोलनकर्त्यांनी घेतली. तसेच मीडियाला बाईट ही देऊ नये अशी भूमिका घेतली गेली, तसेच आव्हाड यांना विरोधही करण्यात आला. अखेर काही क्षणात आव्हाड यांना तेथून पाय उतार व्हावे लागले.
मागील काही दिवसांपासून हे उपोषण सुरू आहे. मंगळवारी सायंकाळी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे यांनी या ठिकाणी भेट देत या आंदोलनाला पाठिंबा दिला. तसेच यावेळी राष्ट्रीवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी देखील या आंदोलनाच्या ठिकाणी हजेरी लावत या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला. मात्र ते स्टेजवर जाताच काहींनी त्यांच्या विरोधात घोषणा दिल्या, इथे कोणत्याही आमदार खासदाराने स्टेजवर येऊ नये अशी भूमिकाही घेतली, त्यामुळे काही वेळ याठिकाणी तणावाचे वातावरण होते. यावेळी पोलिसांनी मध्यस्थी केली. मात्र आव्हाड यांनी येथे प्रतिक्रिया सुद्धा देऊ नये अशी भूमिका घेण्यात आल्याने आव्हाड यांना तेथून काढता पाय घ्यावा लागला.
आंदोलन स्थळी यापुढे एकाही राजकीय नेत्याने मग तो आमदार असेल खासदार असेल कोणी ही येऊ नये. ज्यांना या आंदोलनाला पाठिंबा द्यायचा असेल त्यांनी आपले राजीनामे द्यावेत मगच येथे यावे असा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच या पुढे आंदोलनस्थळी कोणताही गोंधळ होणार नाही याची काळजी आम्ही घेऊ.(रमेश आंब्रे - मराठा समाजाचे कार्यकर्ते)