डोंबिवली : इंधन दरवाढीच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने डोंबिवली येथील दोन पेट्रोल पंपांवर बुधवारी (26 सप्टेंबर) अनोखं आंदोलन छेडण्यात आले. पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या वाहनचालकांना कमळाचे फुल वाटप करून दरवाढीचा निषेध करण्यात आला. एक ही भूल कमल का फूल, इंधनदरवाढीचा निषेध असे फलक घेऊन केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
दहा वाजून दहा मिनिटांनी आंदोलनाला प्रारंभ करण्यात आला. कमळाला मत देऊन तुम्ही चूक केली आहे त्याचे भोग आपण आता भोगत आहोत. पुढच्या वेळेस अशी चूक करू नका असे आवाहन पेट्रोल पंपावर आलेल्या ग्राहकांना करण्यात आले. संबंधित वाहनचालकांना यावेळी कमळाच्या फुलाचे वाटपही करण्यात आले. राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन छेडण्यात आले. यावेळी पक्षाचे कल्याण डोंबिवली युवक जिल्हाध्यक्ष सुधीर पाटील यांच्यासह सारिका गायकवाड, विनया पाटील, दत्ता वङो, राजेंद्र नांदोस्कर, निरंजन भोसले, पूजा पाटील, प्रसन्न अचलकर, जगदीश ठाकूर, सीप्रीयन डिसोझा, नंदू धुळे, मिलिंद भालेराव, भाऊ पाटील आदि पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते मोठया संख्येने सहभागी झाले होते. शहरातील एमआयडीसी भागातील आणि कल्याण शीळ मार्गावरील अशा दोन ठिकाणच्या पेट्रोल पंपावर हे आंदोलन करण्यात आले. जनजागृतीसाठी हे आंदोलन छेडण्यात आले आहे.
तर लवकरच घालणार सरकारचे श्राद्ध
पेट्रोलची खरेदी किंमत पेट्रोल पंप चालकांना साधारण 40 रूपये प्रति लिटर इतकी पडते. परंतू एक्साइज आणि वॅट तसेच अन्य कराच्या वसुलीमुळे आजच्या घडीला ग्राहकाला 90 रूपये प्रति लिटर पेट्रोल मागे खर्च करावा लागत आहे. जे वाढीव कर आकारले जात आहेत ते कमी करावेत अशी आमची मागणी आहे. सरासरी पेट्रोलच्या मागे दहा रूपये प्रति लिटर कमी व्हावेत याचा भार केंद्र आणि राज्य सरकारने उचलावा या दृष्टीकोनातून हे आगळे वेगळे आंदोलन केलेले आहे. कमळाला मत देऊन जी चूक झाली आहे. ती पुन्हा होऊ नये यासाठी कमळाचे फुल देऊन नागरिकांना आवाहन करण्यात आल्याचे प्रदेश प्रवक्ते तपासे यांनी सांगितले. सध्या पितृ पंधरवडा सुरू आहे. जर इंधनाचे दर कमी नाही झाले तर लवकरच सरकारचे श्राद्ध घातले जाईल असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.