राष्ट्रवादी शरद पवार गटाची ठाणे कार्यकारणीची भरगच्च यादी जाहीर
By अजित मांडके | Published: October 21, 2023 04:23 PM2023-10-21T16:23:00+5:302023-10-21T16:23:08+5:30
माजी नगरसेवकांना विशेष निमंत्रितांमध्ये स्थान
ठाणे : राष्ट्रवादी शरद पवार गटाची ठाणे शहर नवीन कार्यकारणी जाहीर झाली आहे. यात २५ उपाध्यक्ष, १० सरचिटणीस, १० चिटणीस, ३२ सचिव, चारही विधानसभा अध्यक्ष, कार्याध्यक्ष, ब्लॉक अध्यक्ष, कार्याध्यक्ष, महिला कार्याध्यक्ष, आदींसह विविध सेलच्याही नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. याशिवाय माजी नगरसेवकांना विशेष निमंत्रीतांच्या यादीत समावेश करण्यात आला असून भरगच्च यादी जाहीर झाली आहे. परंतु मुंब्य्रातील काही माजी नगरसेवकांनी वेगळी चुल मांडल्याने त्यांना यात स्थान देण्यात आले नाही.
राष्ट्रवादीचे दोन गट झाल्यानंतर शरद पवार आणि अजित पवार गट असे दोन गट तयार झाले आहेत. त्याचे पडसाद ठाण्यातही उमटल्याचे दिसून आले. त्यात ठाणे शहर अध्यक्ष असलेले आनंद परांजपे यांनी देखील अजित पवार यांच्या सोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे त्यांच्या जागी सुहास देसाई यांची शहर अध्यक्ष पदी नियुक्ती झाली होती. त्यानंतर शनिवारी शरद पवार गटाची ठाण्याची भरगच्च अशी कार्यकारणी जाहीर झाली आहे. त्यात अनेक नव्या जुन्या चेहऱ्यांना संधी देत नाराजी देखील दूर करण्याचा प्रयत्न केला गेला आहे.
ज्यांना संधी मिळत नाही, ते इतर पक्षात उडी मारतात असे इतर पक्षात चित्र दिसत आहे. त्यामुळे हा संभाव्य धोका टाळण्यासाठी जवळ जवळ सर्वांनाच संधी देत ही नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला गेल्याचे यादीकडे पाहिल्यास दिसून येत आहे. त्यामुळेच उपाध्यक्ष पदी थेट २५ जणांना संधी देण्यात आली आहे. इतकेच नाही तर ही संधी देतांना ज्यांना आतापर्यंत डावलण्यात आले होते, त्यांना देखील संधी देत आपलेसे करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. प्रभाकर सावंत, माजी नगरसेवक हिरा पाटील, एकनाथ जाधव यांच्यासह यात २५ जणांचा समावेश आहे.
दुसरीकडे सरचिटणीस (प्रशासन) पदी देखील १०, चिटणीस १० आणि तब्बल ३२ सचिव पदे देण्यात आली आहेत. तर तिजोरीच्या चाव्या अर्थात खजनिदारपदी माजी नगरसेवक अमित सरय्या यांची निवड झाली आहे. याशिवाय आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून चारही विधानसभेच्या ठिकाणी अध्यक्ष आणि कार्याध्यक्षांची देखील नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच ब्लॉक अध्यक्ष, कार्याध्यक्षांची निवड करण्यात आली आहे.
महिलांची फळी मजबुत करण्यासाठी प्रयत्न केला गेला आहे. युवक अध्यक्षपदी विक्रम खामकर, मयुर शिंदे याची युवक कार्याध्यक्ष, पल्लवी जगताप युवती अध्यक्ष आदींसह सामजिक न्याय, ओबीसी सेल, अल्पसंख्याक सेल, व्यापारी, असंघटीत कामगार, लीगल , वैद्यकीय, हॉर्कस, जेष्ठ नागरीक, सोशल मिडिया आदी पदावर देखील नव्याने नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.
माजी नगरसेवकांना विशेष निमंत्रितांमध्ये संधी
राष्ट्रवादीच्या जे शिल्लक आहेत, त्यातील बहुतुकांना विशेष निमंत्रीतांमध्ये संधी देण्यात आली आहे. यात मनोहर साळवी, मिलिंद पाटील, महेश साळवी, शाणु पठाण, माजी युवक अध्यक्ष मंदार केणी यांच्यासह ३८ जणांना विशेष निमंत्रीतांमध्ये स्थान देण्यात आले आहे.