ठाणे : कळवा पूर्व परिसरात वाघोबानगर येथे नागरिकांना पाणी मिळत नसल्याच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे नगरसेवक आमने-सामने आले. या भागात पाण्याचे राजकारण केले जात असल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या नगरसेवकाने केल्याने उपमहापौरांनी थेट डायसवरून खाली येऊन हा मुद्दा खोडून काढण्याचा प्रयत्न केला. तर, पाण्याचे राजकारण कोण करतो आहे, हे शिकविण्याची आम्हाला गरज नसल्याचा प्रतिहल्ला थेट महापौरांनी राष्ट्रवादीवर केला. त्यामुळे सभागृहात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. याच गोंधळात महापौरांनी पुन्हा एकदा उर्वरित किचकट विषय कोणतीही चर्चा न करता मंजूर करून घेतले. कळवा पूर्व येथील राष्ट्रवादीच्या नगरसेविका रीटा यादव यांनी त्यांच्या प्रभागात पाण्याचा प्रश्न अत्यंत ज्वलंत झाल्याचा मुद्दा शनिवारच्या महासभेत मांडला. या वेळी त्यांनी कळवा पूर्व येथील वाघोबानगरबरोबर आजूबाजूच्या परिसरात पाण्याची कशी वानवा आहे, याचा ऊहापोह केला. तर, अपर्णा साळवी यांनीदेखील सलग दोन दिवसांच्या शटडाऊनमुळे कळवावासीयांचे पाण्यासाठी हाल सुरू झाल्याचा मुद्दा उपस्थित केला. त्यामुळे या भागातील पाण्याची समस्या मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी त्यांनी केली. याच वेळेस राष्ट्रवादीचे नगरसेवक महेश साळवी यांनी येथे शिवसेनेच्या प्रभागात शेवटच्या टोकापर्यंत पाणी असते, परंतु दुसरीकडे, राष्ट्रवादीच्या प्रभागात पाणी गायब होत आहे. येथे असलेला वॉलमन हे कृत्य करीत असून, येथे पाण्याचे राजकारण केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यांनी थेट उपमहापौर राजेंद्र साप्ते आणि शिवसेनेलाच टार्गेट केल्याने उपमहापौरांनी डायसवरून खाली उतरून सदस्यांमध्ये येऊन याचा खुलासा करण्याचा प्रयत्न केला. परंतु, लोकशाही आघाडीचे नगरसेवक या मुद्द्यावरून आक्रमक झाल्याने महापौर संजय मोरे यांनी राजकारण कोण करते आहे, हे आम्हाला चांगले माहीत असून, उगाच आम्हाला बोलायला लावू नका, असा प्रतिहल्ला केला. त्यामुळे सभागृहातील वातावरण तापले. लोकशाही आघाडीच्या नगरसेवकांनी महापौरांचा निषेध करून सभागृह उचलून धरले. अखेर, महापौरांनी या गोंधळातच पटलावर असलेले इतर सर्वच विषय कोणत्याही प्रकारची चर्चा न करता मंजूर करून घेतले.
पाण्याच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी-शिवसेना आमने-सामने
By admin | Published: November 22, 2015 2:50 AM