ठाणे - ठाणे शहराला खड्ड्यांनी वेढले आहे. नवनव्या प्रयोगाद्वारे खड्डे बुजवण्याची घोषणा जात आहे. कोट्यवधी रुपयांचा चुराडा केला जात आहे. मात्र खड्ड्यांची समस्या कायम असल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने हरिनिवास येथे " ठाणे तलावांचे नव्हे तर खड्ड्यांचे शहर" असे फलक लावले आहेत. दरम्यान, ठाणे शहरात प्रवेश करणारे टोलनाके आम्हीच आंदोलन केल्याने बंद झाले आहेत, आता या खड्ड्यात शहर बुडत असल्याने बोट सेवा सुरू करायची का? असा सवाल आ. जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला आहे.
ठाणे शहरात सध्या खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. शहरातील सर्वच रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. खड्डेमुक्त शहरासाठी कधी अमेरिकन तर कधी अन्य तंत्रज्ञान वापरण्याची घोषणा पालकमंत्री तर ठामपा प्रशासन करीत आहे. पण शहरातील खड्ड्यांचे विघ्न दूर होत नाही. या खड्ड्यांमागे मोठे अर्थकारण असल्यानेच सत्ताधारी शिवसेना आणि ठाणे महानगर पालिकेच्या प्रशासनाला खड्डे प्रिय असल्याचा आरोप करीत राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने हे फलक लावण्यात आले आहेत.
या संदर्भात शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी सांगितले की, ठाणे शहर कधीकाळी तलावांचे शहर म्हणून ओळखले जात होते. आता हे शहर खड्ड्यांचे शहर म्हणून आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळखले जाण्याची शक्यता अधिक आहे. येथील सत्ताधारी शिवसेना आणि प्रशासन यांना शहराच्या या मुख्य समस्येशी काही देणे घेणे नाही. गणेशोत्सव तोंडावर आलेला असतानाही पालकमंत्री आणि पालिका प्रशासनाकडून केवळ विविध तंत्रज्ञान वापरण्याची घोषणा केली जात आहे. आता आम्ही हे सहन करणार नाही. जर दहा दिवसात खड्डेमुक्त ठाणे न दिसल्यास आम्ही उग्र आंदो लन छेडू असा इशाराही दिला. तर, खड्डे बुजवण्यासाठी पालिका प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांकडे अनेकदा मागणी करूनही निगरगट्ट झालेले हे प्रशासन आणि सत्ताधारी शिवसेना खड्ड्यात स्वतःची आर्थिक उन्नती शोधत आहेत. त्यामुळेच ठाणेकरांचा प्रवास खड्ड्यात होत आहे, अशी टीका ठामपाचे विरोधी पक्ष नेते मिलिंद पाटील यांनी केली आहे.