रात्रीतल्या काजव्यांनी सूर्याबद्दल बोलू नये; राष्ट्रवादी प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे यांचा टोला
By अजित मांडके | Published: January 2, 2024 04:13 PM2024-01-02T16:13:59+5:302024-01-02T16:16:09+5:30
अजित पवार हे महाराष्ट्रातील राजकारणातील सूर्य आहेत. लवकरच मकरसंक्रांत येते आहे, सूर्याचे उत्तरायण सुरु होईल आणि सूर्याचे तेजदेखील वाढेल.
ठाणे :अजित पवार हे महाराष्ट्रातील राजकारणातील सूर्य आहेत. लवकरच मकरसंक्रांत येते आहे, सूर्याचे उत्तरायण सुरु होईल आणि सूर्याचे तेजदेखील वाढेल. त्यामुळे रात्रीतल्या काजव्यांनी सूर्याबद्दल जास्त बोलू नये, असा टोला राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे यांनी आमदार जितेंद्र आव्हाड यांना लगावला. तसेच डॉ. जितेंद्र आव्हाड यांची राजकारणाची पद्धत स्वार्थी, आत्मकेंद्रित असल्याने त्यांना अजित पवारांचा स्वभाव पचनी पडत नसल्याची टीका देखील त्यांनी केली.
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर नुकतेच बेछूट, बेलगाम आरोप केले. त्याचा अजित पवार गटाचे प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे यांनी समाचार घेतला.
श्रद्धेय शरदचंद्र पवार यांचे योगदान, मग ते समाजकारणातील असेल, राजकारणातील असेल, ते नाकारण्याचे कुठलेही कारण नाही. ज्यावेळेला अजित पवार १९९१ मध्ये बारामती लोकसभा लढण्याची संधी दिली. त्यानंतर सातत्याने होणाऱ्या प्रत्येक विधानसभेची निवडणूक, बारामती विधानसभेतुन वाढत्या मताधिक्य्याने अजितदादा जिंकत आले आहेत. २०१९ च्या विधानसभेत अजित १ लाख ९५ हजार ६४१ मते मिळाली होती. एकूण मतदानाच्या ८३. २४ टक्के मते ही अजितदादांना मिळाली होती.
यावेळी सर्व विरोधी उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले होते. महाराष्ट्रातल्या २८८ विधानसभा मतदार संघातील सर्वात जास्त मताधिक्य १ लाख ६५ हजार २६५ मतांनी अजितदादा विजयी झाले. त्यामुळे अजितदादांनी केवळ आपले कर्तृत्व बारामती पुरते न मर्यादित ठेवता आपले कर्तृत्व आणि नेतृत्व हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रस्थपित केलेले आहे. पुढे जाऊन डाॅ. जितेंद्र आव्हाड हे देखील बोलले की, अजितदादा हे कायम दादागिरी करतात, अनेक वर्षे ते पक्षामध्ये दादागिरी करत आले आहेत. अजित दादांचा स्वभाव हा रोखठोक आहे. खऱ्याला खरे आणि खोट्याला खोटे ते स्पष्टपणे सांगतात. एखादे काम जर होणार नसेल तर ते तोंडावर सांगतात की हे काम माझ्याच्याने होणारे नाही.
पण डाॅ जितेंद्र आव्हाड यांची राजकारणाची पद्धत स्वार्थी, आत्मकेंद्रित असल्याने कदाचित त्यांना अजितदादांचा स्वभाव पचनी पडत नसल्याची टीका देखील परांजपे यांनी केली. तसेच जितेंद्र आव्हाड यांनी देखील कधीतरी आत्मचिंतन करावे की, ठाणे जिल्ह्यातील अनेक चांगली माणसे राष्ट्रवादी काँग्रेस का सोडून गेली. आव्हाडांच्या स्वार्थी राजकारणाला, आत्मकेंद्रित राजकारणाला कंटाळून ठाणे जिल्ह्यातील अनेक मान्यवर नेते, राष्ट्रवादी काँग्रेस सोडून गेले असल्याचा आरोप देखील परांजपे यांनी यावेळी केला.