ठाणे (प्रतिनिधी)- राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते अजित पवार यांनी पक्षाध्यक्ष शरद पवार यांना अंधारात ठेऊन भाजपला पाठिंबा देत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याच्या तीव्र प्रतिक्रीया ठाण्यात उमटल्या. संतप्त झालेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आ. जितेंद्र आव्हाड आणि शहराध्यक्ष आनंद परांजपे यांच्या मार्गदर्शनाखाली ठामपा विरोधी पक्षनेते मिलींद पाटील यांच्या नेतृत्वाखाली अजित पवार यांच्या निषेधार्थ घोषणाबाजी केली. अजित पवार यांच्या प्रतिमेला जोड्याने मारले. दरम्यान, त्यांच्या पुतळ्याचे दहन करण्याचाही प्रयत्न कार्यकर्त्यांनी केला.
शरद पवारांना अंधारात ठेवून अजित पवार यांनी शनिवारी सकाळी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या संदर्भात राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन अजित पवार यांनी आमदारांना फसवून राजभवनात नेले असल्याचे सांगितले. त्यानंतर आधीच संतप्त झालेले कार्यकर्ते अधिकच आक्रमक झाले. या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष कार्यालयाबाहेर अजित पवार मुर्दाबादच्या घोषणा देत त्यांच्या प्रतिमेला जोड्याने मारले. तसेच, त्यांच्या प्रतिमेला काळे फासून ती जाळण्याचाही प्रयत्न केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक, नगरसेविका आदी उपस्थित होते.
या वेळी मिलींद पाटील यांनी सांगितले की, अजितदादा पवार यांनी घेतलेल्या निर्णयामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. शरद पवारसाहेबांनी अत्यंत मेहनतीने मिळवलेले हे यश धुळीला मिळवण्याचा प्रयत्न अजितदादांनी केलेला असल्यानेच कार्यकर्त्यांनी आपल्या भावना या आंदोलनातून व्यक्त केल्या.
राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अजितदादांविरोधात घोषणाबाजी केली आहे. अजित पवार मुर्दाबाद अशा घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे व्हाय. बी सेंटरमध्ये दाखल झाले असून थोड्याच वेळात पत्रकार परिषदेतून आपली भूमिका माध्यमांसमोर स्पष्ट करणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस आणि पवार कुटुंबात फूट पडल्याचं आता स्पष्ट झालं आहे. भाजपाने थेट राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनाच सोबत घेत सत्ता स्थापन केली आहे.