ठाणे : ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे बुधवारी रात्री सुरू असलेल्या ‘हे राम नथुराम’ या नाटकाच्या प्रयोगाच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी गोंधळ घालून नाटकात व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला. नौपाडा पोलिसांनी लागलीच हस्तक्षेप करून १० कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्यानंतर नाटकाचा प्रयोग पुन्हा सुरू करण्यात आला.रात्री ८.३० वा.च्या सुमारास शरद पोंक्षे लिखित नथुराम गोडसे यांच्यावरील हे नाटक सुुरू झाले. त्यामध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना लक्ष्य केले आहे. नाटक सुरू झाल्यानंतर अर्ध्या तासाने प्रेक्षकांमधील राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी सुरू केली. ‘गांधी हम शरमिंदा है, तेरे कातिल अभी जिंदा है’, अशा घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या. यामुळे नाटकाचा खेळ थांबला आणि प्रेक्षकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले. त्यामुळे तातडीने पोलिसांना पाचारण करण्यात आले. नौपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पोफळे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने १० तरुणांना ताब्यात घेतले. (प्रतिनिधी)
‘नथुराम’विरोधात राष्ट्रवादी कार्यकर्त्यांची घोषणाबाजी
By admin | Published: January 26, 2017 4:34 AM