ठाणे : वारंवार वाढत असलेल्या गॅस सिलिंडर दराच्या विरोधात ठाण्याच्या विविध भागात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात बॅनर लावले आहेत. ‘सबका साथ, सबका विकास’ म्हणणाऱ्या मोदी यांनी आता ‘सबका प्रयास’ असा नवा नारादेखील दिला आहे. मात्र, त्यांच्याच प्रयासामुळे गॅस सिलिंडरचे दर ९०० रुपयांच्या आसपास गेले आहेत, असे सांगून राष्ट्रवादी काँग्रेसने सबंध ठाणे शहरात ‘‘ धन्यवाद, आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी’’ असा संदेश देणारे फलक लावले आहेत.
२०१४ मध्ये देशात घरगुती सिलिंडरचे दर ४१० रुपये होते. ते आता ८८९.५० रुपयांवर गेले आहेत. गणेशोत्सव तोंडावर असतानाच गॅसचे दर वाढल्याने सामान्यांचे कंबरडे मोडले आहे. निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने हे अनोखे फलक लावून दरवाढीबद्दल चक्क मोदींचेच आभार मानले असल्याचे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी सांगितले.