ठाणे : येत्या १ मे रोजी महाविकास आघाडीची मुंबईत वज्रमुठ सभा घेण्यात येणार आहे. त्यानुसार त्याची जोरदार तयार सुरु असतांनाच आता राष्ट्रवादीने ठाण्यातील विशेष करुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच मतदार संघात या संदर्भातील बॅनरबाजी केल्याचे दिसून आले. एकप्रकारे राष्ट्रवादीने वागळे, किसननगर भागात बॅनर लावून शक्तीप्रदर्शन करण्याचाच प्रयत्न केल्याचे दिसत आहे.
राज्यात महाविकास आघाडी विरुध्द शिवसेना भाजप असा सामना रंगतांना दिसत आहे. आरोप प्रत्यारोपांच्या फैऱ्या झडत आहेत. त्यामुळे मागील सात महिन्यापासून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. परंतु आता महाविकास आघाडीने या युती सरकाराला आपली जागा दाखविण्यासाठी राज्यभर वज्रमुठ सभा आयोजित केल्या आहेत. त्यानंतर आता मुंबईत देखील ही सभा येत्या १ मे रोजी होऊ घातली आहे. मुंबई हा उध्दव ठाकरे यांचा बालेकिल्ला मानला जात आहे. याच बालेकिल्यावर शिंदे, फडणवीस सरकाराने यांनी आपली पकड घट्ट करण्यासाठी तयारी केली आहे.
दुसरीकडे आता महाविकास आघाडीने देखील मुंबई काबीज करण्यासाठी हालचाली सुरु केल्या आहेत. त्यामुळे मुंबईत होणाºया या सभेला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. परंतु असे असतांना ठाण्यातील केवळ वागळे आणि किसन नगर पट्यातच राष्ट्रवादीने याच वज्रमुठ सभेचे पोस्टर, बॅनर लावून एक प्रकारे मुख्यमंत्री शिंदे यांनी आव्हान देण्याचा प्रयत्न केल्याचे दिसत आहे. शहराच्या इतर भागात अगदी तुरळक बॅनर दिसत असतांना वागळे पट्यात मात्र अधिक संख्येने बॅनर लावण्यात आल्याने राजकीय वातावरण तापल्याचे दिसत आहे. आम्ही केवळ मोठ्या संख्येने नागरीकांनी यावे या उद्देशाने हे बॅनर लावले असल्याची माहिती राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांनी दिली आहे. परंतु वागळे, किसननगर भागात लावण्यात आलेल्या बॅरनवरुन राष्ट्रवादीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मतदार संघात एक प्रकारे शक्तीप्रदर्शन केल्याचे बोलले जात आहे.