ठाणे - मेट्रो पाचचे भुमीपुजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत आहे. परंतु या मेट्रोची साधी निविदा प्रक्रियाही सुरु झालेली नाही, त्याबाबत अद्याप अंतिम धोरण निश्चित झाले नसतांना त्याचे भुमीपुजन कसे काय असा सवाल राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला आहे. तर मेट्रोची अलायमेंट ही वास्तविक पाहता, कळवा, मुंब्रा, शीळ, डोंबिवली, कल्याण एपीएमसी अशी असणे अपेक्षित असतांना भिवंडी मधून करण्यात आलेली अलायमेंट ही केवळ भाजपाच्या खासदारासाठीच करण्यात आल्याचा आरोप राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांनी केला आहे. एकीकडे मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे भुमीपुजनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कल्याणला येत असतांना, दुसरीकडे कळवा आणि मुंब्रा वासियांवर अन्याय का? अशा आशयाचे फलक लागले असतांना या मेट्रो पाचच्या मार्गाची अलायमेंटच चुकीच्या पध्दतीने झाल्याचा दावा राष्ट्रवादीने केला आहे. या संदर्भात यापूर्वी सुध्दा संबधींताबरोबर चर्चा झाली होती. मेट्रो पाचच्या सध्याच्या मार्गाने केवळ २ लाख २९ हजार प्रवासीच प्रवास करु शकणार आहेत. परंतु हीच मेट्रो जर कापुरबावडी वरुन पुढे कळवा, मुंब्रा, शिळ, डोंबिवली मार्गे कल्याण एपीएमसी मार्केटला नेली असती तर त्याचा फायदा मध्य रेल्वेवरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांनासुध्दा झाला असता. परंतु ज्या ठिकाणी प्रवासी नाहीत, त्याठिकाणाहून ही मेट्रो नेली जात असल्याचा आरोप परांजपे यांनी केला आहे. केवळ भाजपाच्या खासदारासाठीच मेट्रोचा मार्ग हा उलट्या दिशेने आखला गेल्याचा टोलाही त्यांनी लगावला आहे.शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा भाजपाचा डाव - जितेंद्र आव्हाडहा मार्ग उलट्या दिशेने फिरविणे म्हणजे भाजपाने एक प्रकारे शिवसेनेला कोंडीत पकडण्याचाच केलेला हा प्रयत्न म्हणावा लागणार असल्याचा टोला राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शिवसेनेला लगावला. या गोष्टीकडे पालकमंत्री तसेच कल्याणच्या खासदारांनी लक्ष घालायला हवे होते. परंतु त्यांना सुध्दा ही गोष्ट कशी कळली नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. तुम्हाला जर याचा अभ्यास नसेल तर मतभेद विसरुन परांजपे यांच्याकडून अधिक अभ्यास करुन घ्यावा असा सल्लाही त्यांनी शिवसेनेला दिला आहे. त्यामुळे या मेट्रोचे मोनो होणार असून केवळ लॉस देणारी ही मेट्रो ठरणार असल्याचेही त्यांनी सांगितले. भुमीपुजन करतांना किमान निविदा प्रक्रिया तरी पूर्ण करणे अपेक्षित होते. परंतु ते न करता केवळ मतदारांच्या डोळ्यात धुळफेक करण्याचा भाजपाने केलेला हा केवीलवाना प्रयत्न असल्याचेही त्यांनी सांगितले.
मेट्रो पाचची साधी निविदा प्रक्रियाही नसतांना भुमीपुजनचा घाट कशासाठी, राष्ट्रवादीचा भाजपाला सवाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2018 5:08 PM
मेट्रो पाचच्या भुमीपुजनाचा वाद आणखी वाढला असून, या वादात आता राष्ट्रवादीने सुध्दा उडली घेतली आहे. या मेट्रोची अलायमेंटच चुकीची झाली असल्याचा दावा ठाणे शहर राष्ट्रवादीने केला असून मेट्रोचा मार्ग केवळ भाजपाच्या खासदारासाठीच वळविण्यात आल्याचा आरोप राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांनी केला आहे.
ठळक मुद्देमतदारांच्या डोळ्यात धुळ फेकण्याचे कामकेवळ भाजपाच्याच खासदारासाठीच मेट्रो पाचच अट्टाहास