ठाणे : ठाण्यातील हाजुरी भागातील नागरिकांच्या सोयीसुविधा आणि विकासकामांकडे महापालिका प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करून राष्ट्रवादीने शुक्रवारी या भागात आंदोलन केले. परंतु, हा आंदोलनाचा बार फुसका असल्याचेच पुरावे आता शिवसेनेने दिले आहेत. आगामी ठाणे महापालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची सुरुवात मात्र या निमित्ताने सुरू झाल्याचे दिसत आहे.
राष्ट्रवादीचे फिरोज पठाण यांनी शुक्रवारी हाजुरीत विविध समस्या सोडविण्यासाठी आंदोलन केले होते. जिलानी वाडीत रस्ता रुंंदीकरणात बाधितांचे पुनर्वसन करावे, उर्दू स्कूलच्या मैदानावर उभारण्यात येत असलेल्या डाटा सेंटरच्या इमारतीच्या बांधकामामुळे शाळेचे मैदान बाधित झाले असून ते अद्यापही पूर्ववत केले नाही आणि हजुरीत दर पावसाळ्यात नागरिकांच्या घरात मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी शिरते यावर उपाय म्हणून परिसरात पर्यायी नाले तयार करावेत, अशा मागण्या त्यांनी केल्या होत्या.
परंतु, आंदोलनकर्त्यांनी जे काही आरोप केलेले आहेत ते बिनबुडाचे असल्याचा दावा शिवसेनेचे स्थानिक नगरसेवक विकास रेपाळे यांनी केला आहे. हाजुरी शाळेसमोर कोणत्याही स्वरूपाचे मैदान नव्हते, तसेच रस्ता रुंदीकरणात बाधितांना घरे दिलेली आहेत. त्यातही ४५ फुटी रस्ता हा ६० फुटी करण्यासंदर्भातील ठरावदेखील झालेला आहे. मात्र, पावसामुळे हे काम थांबले असून ते लवकरच सुरू होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे आंदोलनाचा हेतू काय होता असा सवालही आता उपस्थित झाला आहे. केवळ आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा एक स्टंट असल्याचा दावा शिवसेनेने केला आहे. परंतु, यानिमित्ताने शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना पुन्हा रंगल्याचे दिसून आले.