ठाणे - ठाणे महापालिकेच्या थीम पार्क प्रकरणाला आता रोजच्या रोज वेगळे वळण लागत आहे. थीम पार्कसाठी मागविण्यात आलेल्या निविदांमध्ये दोन निविदा या एकाच कंपनीच्या डायरेक्टरच्या होत्या. अशी धक्कादायक माहिती राष्ट्रवादीने पुढे आणली आहे. त्यामुळे नियमानुसार फेरनिविदा काढणे अपेक्षित असल्याचे मत विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील यांनी व्यक्त केले. तर या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी महापालिका आयुक्तांनीच अॅण्टी करप्शनकडे लेखी स्वरुपात तक्रार करावी आणि या प्रकरणात दोषी असलेल्यांवर कारवाई करावी अशी मागणी शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांनी केली. एकीकडे आयुक्तांनी ठेकेदार आणि काही अधिकाऱ्यांवर ठपका ठेवला असून या प्रकरणाची आकड्यांची गोळा बेरीज सादर करुन यात भ्रष्टाचार झाल्याचे मान्य केले आहे. परंतु प्रशासनातील त्या अधिकाऱ्याने अहवालात आकड्यांचा खेळ मांडला असून दोन संस्थेने खर्चाची आकडेवारी दिली आहे. तो खर्च एकच असून पालिकेच्या अधिकाऱ्यांनी मात्र त्या एका खर्चाची फोड करुन ठेकेदाराला एक प्रकारे वाचविण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही यावेळी पाटील यांनी केला. शिवाय महासभेत गोंधळात प्रस्ताव मंजुर करण्याची प्रथा सत्ताधारी शिवसेनेची आहे. त्यामुळे या प्रस्तावावर चर्चा करायची असतांनाही त्याला गोंधळात मंजुरी दिली गेली आहे. तर स्थायी समितीमध्ये सुध्दा आयत्या वेळेच्या विषयात हा विषय घसवून त्याला मंजुरी देण्यात आल्याचा दावा राष्ट्रवादीने केला आहे. त्यातही या कामासाठी तीन निविदा आल्या होत्या. त्यातील दोन निविदांचे डायरेक्टर एकच होते. त्यामुळे फेरनिविदा काढणे अपेक्षित होते. परंतु तसे न करता पालिकेने जाणून बजून आपल्या मर्जीतील ठेकेदाराला काम दिल्याचा आरोपही त्यांनी केला. या संदर्भात १४ नोव्हेंबर आणि डिसेंबर २०१८ मध्ये लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करण्यात आली होती. परंतु हा विभाग सुध्दा शिवसेनेच्या दबावाखाली असल्याचा आरोप शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांनी केला आहे. त्यामुळे आयुक्तांनी आता आपले तोंड उघडावेच आणि या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करण्यासाठी त्यांनी या विभागाकडे लेखी तक्रार करावी आणि यातील तथ्य बाहेर काढावे अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
थीम पार्क प्रकरणात आयुक्तांनीच अॅण्टी करप्शनकडे तक्रारी करावी, राष्ट्रवादीची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2019 3:56 PM
थीम पार्क प्रकरणात आता राष्ट्रवादीने आक्रमक भुमिका घेतली आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी आयुक्तांनीच अॅण्टी करप्शन विभागाकडे तक्रार करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
ठळक मुद्देनिविदा ठराविक ठेकेदारासाठीचपालिका अधिकाऱ्यांचा आकड्यांचा खेळ