- अजित मांडके ठाणे : महापालिका निवडणुकीत दुस-या क्रमांकाच्या जागा मिळवणा-या राष्ट्रवादीमध्ये एकाच प्रभागातील दोन नगरसेवकांमध्ये सध्या फेसबुक वॉर सुरू झाले आहे. विशेष म्हणजे विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील विरुद्ध ज्येष्ठ नगरसेवक मुकुंद केणी यांच्यात ते सुरू आहे. विहिरीतील दूषित पाण्याच्या मुद्यावरून हा वाद आता आणखी उफाळला असून विहिरीच्या दुरुस्तीच्या श्रेयावरून दोघांमध्ये कलगीतुरा रंगल्याचे चित्र आहे.ठाणे महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीने दुसरा क्रमांक मिळवून तब्बल ३४ जागा जिंकल्या. असे असूनही या निवडणुकीत राष्टÑवादीत तीन गट पडले होते. निवडणुकीनंतर ते बदलले असेल, असे वाटत होते. परंतु, प्रत्यक्षात आता राष्टÑवादीच्या दोन नगरसेवकांमध्ये कोल्ड वॉर सुरू झाले आहे. हे कोल्ड वॉर थेट फेसबुकवर आल्याने सध्या हे दोन्ही नगरसेवक चर्चेत आहेत. हे दोघेही प्रभाग क्रमांक २३ मधून निवडून आले आहेत. पाटील हे ‘अ’ आणि केणी ‘ड’ मधून निवडून आले आहेत. त्यात पाटील हे आव्हाड गटाचे मानले जात असून केणी हे माजी मंत्री गणेश नाईक गटाचे मानले जातात. निवडणुकीच्या काळात नाईक गटाने केलेल्या कृत्यामुळे राष्टÑवादीला तीन ते चार जागांचा फटकाही बसल्याचा दावा आव्हाड गटाने केला होता. त्यात आता फेसबुक वॉर सुरू झाल्याने हे दोन्ही गट पुन्हा एकदा एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत.कळव्यातील मारुती मंदिर परिसरातील विहिरींमधून अनेक दिवस दुर्गंधी येत असून परिसरातील रहिवाशांच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होत असल्याची तसेच विहिरीतील पाणी प्रदूषित झाल्याची स्थानिकांची तक्र ार होती.त्यानुसार, येथे स्वत: हजेरी लावून ती साफ करून घेतल्याची पोस्ट केणी यांनी फेसबुकवर टाकली होती. त्यानंतर, त्यांच्या कामाला अनेकांनी लाइकही केले होते. परंतु, प्रत्यक्षात दोन दिवस पालिकेकडे पाठपुरावा केल्याचा दावा पाटील यांनी केणी यांच्या पोस्टवर कमेंट करून केला आहे. त्यानंतर, ही विहीर साफ झाल्याचेही त्यांचे म्हणणे आहे. पाटील यांनी त्यांच्या फेसबुकवर ही पोस्ट शेअर करणे अपेक्षित होते. असे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. परंतु, प्रत्यक्षात तसे न करता त्यांनी थेट केणी यांच्या कमेंटवर पोस्ट टाकल्याने हे कोल्ड वॉर सुरू झाल्याची चर्चा आहे.माझ्याकडे नागरिकांच्या तक्रारी आल्या होत्या, त्यानुसार मी प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली. परंतु, आमच्यात कामाच्या श्रेयावरून वाद नाही.- मुकुंद केणी,नगरसेवक, राष्ट्रवादीदोन दिवस मी महापालिकेत पाठपुरावा केला होता. त्यानुसार, या तक्रारीची दखल घेण्यात आली आहे. परंतु, केणी यांनी केलेल्या कौतुकासाठी ही पोस्ट टाकली आणि त्यांना फोन करूनही अभिनंदन केले आहे.- मिलिंद पाटील,विरोधी पक्षनेते, ठामपा
विहिरीतील पाण्यासोबत राष्ट्रवादीतील वाद दूषित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2017 6:00 AM