- पंकज पाटीलअंबरनाथ - अंबरनाथ पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी जी अंतिम मतदार यादी तयार करण्यात आले आहे, त्या मतदार यादीत मोठ्या प्रमाणात घोटाळा झाल्याचा आरोप करत राष्ट्रवादीने सोमवारपासून आमरण उपोषण सुरू केले आहे. जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत हे उपोषण सुरूच राहील असे उपोषणकर्त्यांनी स्पष्ट केले आहे. 7 जुलै रोजी अंबरनाथ नगरपालिकेची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली. ही मतदार यादी प्रसिद्ध करताना अनेक हरकतींची दखल न घेता परस्पर नावे इतर प्रभागांमध्ये टाकण्यात आले होते. एवढेच नव्हे तर पालिकेच्या अधिकाऱ्यांनी ज्या मतदारांची हरकत नव्हती अशा मतदारांना देखील इतर प्रभागात टाकले होते.
नियमानुसार ज्या हरकती आल्या होत्या त्या हरकतींची योग्य शहानिशा न करताच मतदार यादी निश्चित करण्यात आली. सर्वात आश्चर्यकारक बाब म्हणजे अंतिम मतदार यादीमध्ये शेकडो नावे परस्पर इतर प्रभागात ढकलण्याच्या प्रताप पालिका अधिकाऱ्यांनी केला होता. या प्रकरणी काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी देखील पालिका प्रशासनाकडे तक्रार केली होती. मात्र या तक्रारीची कोणतीही दखल पालिका प्रशासनाने घेतली नाही. एवढेच नव्हे तर या मतदार यादी घोटाळा प्रकरणी राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात आली. राज्य निवडणूक आयोगाने या प्रकरणी चौकशी करून कार्यवाही करण्याचे आदेश पालिका प्रशासनाला दिले होते, असे असताना देखील या प्रकरणाची कोणतीही चौकशी करण्यात आली नाही. आणि योग्य कार्यवाही देखील करण्यात आली नाही.
याप्रकरणी सतत तक्रार करून देखील पालिका प्रशासन कोणतीही दखल घेत नसल्याने राष्ट्रवादीच्या वतीने उपोषणाचा इशारा देण्यात आला होता. अखेर सोमवारी राष्ट्रवादीचे पदाधिकारी कबीर गायकवाड, सुरेश सिंह आणि रेश्मा सुर्वे यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. त्यांच्या या उपोषणाला मतदारांनी देखील समर्थन दर्शविले आहे. उपोषणाच्या पहिल्या दिवशी राष्ट्रवादीच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी उपोषणाच्या ठिकाणी उपस्थिती लावून आपले समर्थन दर्शवले आहे. मतदार यादीत अधिकाऱ्यांनी घोळ घातलेला असताना ते घोळ दुरुस्त करण्यासाठी पालिकेचे कोणतेही अधिकारी तत्परता दाखवत नसल्याने उपोषण करण्याची वेळ आल्याचे कबीर गायकवाड यांनी स्पष्ट केले.