ठाणे - खासगी ठेकेदाराला खेवरा सर्कल येथील दोन मजले मोफत वापरण्यास देणाऱ्या महापालिकेपुढील अडचणी आता आणखी वाढल्या आहेत. या ठेकेदाराच्या माध्यमातून पालिकेला वार्षिक 68 कोटींच्यावर उत्पन्न मिळणे अपेक्षित होते. तसेच संबंधीत ठेकेदार हा जाहिरातपोटी 15 वर्षांत 114 कोटींचा नफा कमावणार आहे. असे असतानाही पालिकेने या ठेकेदाराचा करही माफ केल्याने पालिकेला आणखी 20 कोटींचा तोटा सहन करावा लागणार आहे. त्यामुळे हा पालिकेतील आणखी एक भ्रष्टाचार असून त्याला पाठीशी घालणाऱ्या आयुक्त संजीव जयस्वाल यांना राष्ट्रवादीकडून सायकल भेट देण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे ठाणे शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांनी दिली. त्यामुळे सत्तेत असलेल्या सत्तधारी शिवसेनेने हा प्रस्ताव रद्द करावा, अशी मागणीही त्यांनी केली.
ठाणे महापालिकेच्या माध्यमातून स्वयंचलित सायकल स्टेशन प्रकल्पांतर्गत शहरात विविध 50 ठिकाणी सायकल स्टेशन्स उभारण्यात आली आहेत. प्रत्येक स्टेशनवर 10 सायकली ठेवण्यात येत आहेत. या प्रकल्पासाठी साईन पोस्ट इंडिया प्रा. लि. या कंपनीला शहरातील मोक्याच्या ठिकाणांवर जागा व त्यावरील जाहीरातीचे अधिकार बहाल करण्यात आले आहेत. त्यातून ठेकेदाराला पुढील 15 वर्षात 114 कोटींचा नफा होणार असल्याची धक्कादायक माहिती परांजपे यांनी दिली. शिवाय शहरातील जाहिरात करणाऱ्यांकडून पालिका कर वसुल करीत असते. परंतु या ठेकेदारावर तीसुध्दा मेहरनजर करण्यात आल्याने पालिकेला 20 कोटींच्या उत्पन्नावर पाणी सोडावे लागणार असल्याचेही त्यांनी सांगितले. एकीकडे त्याच इमारतीत असलेल्या एसआरएच्या कार्यालयाकडून पालिका भाडे वसुल करीत असताना या खाजगी ठेकेदारावर मेहरनजर कशासाठी असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
महासभेत हा ठराव नामंजूर करण्यात आला होता. शिवाय भाजपाची मंडळी या ठरावाच्या विरोधात बोलत असताना त्यांना मुख्यमंत्र्यांचा हा प्रस्ताव असल्याचे सांगण्यात आले होते. त्यामुळे त्यांनी आपला आवाजही बंद केला. परंतु याचा अधिक तपास केला असता, ही कंपनी नागपुरस्थिती असून त्याचे डायरेक्टर श्रीपाद अष्टेकर असल्याचा गौप्यस्फोटही परांजपे यांनी पत्रकार परिषदेत केला. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या नावाचा वापर करुन भाजपावाल्यांचा आवाजही दाबण्याचा प्रयत्न पालिकेने केल्याने आता भाजपावाल्यांनी सुध्दा या विरोधात आवाज उठविण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. त्यामुळे हा प्रस्ताव रद्द करुन ठाणेकरांच्या कररुपी पैशाचा भ्रष्टाचार करणो शिवसेना, भाजपा आणि प्रशासनाने बंद करावी, अन्यथा मोठा उद्रेक होईल असेही त्यांनी सांगितले. शिवसेनेला विनंती आहे, की 68 कोटींचे नुकसान सोसण्यापेक्षा त्याच पैशातून अशा प्रकारच्या सायकली शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने 8 ते 10 वीच्या गरीब विद्यार्थ्यांना मोफत द्याव्यात अशी मागणीही त्यांनी केली. पालिका 88.82 कोटींचा चुना प्रशासन लावत असल्याने शिवसेना गप्प का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.