ठाणे - विंग कमांडर अभिनंदन वर्थमान यांना पाकिस्तानने आपल्या ताब्यात घेतले आहे. जिनीव्हा करारानुसार त्यांना मुक्त करणे गरजेचे असतानाही पाकने त्यांना डांबून ठेवले आहे. पाक सरकारला सुबुद्धी यावी आणि त्यांनी अभिनंदन यांना मुक्त करावे, तसेच, सीमेवरील जवानांच्या सुरक्षेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने गणेशवाडी येथील तुळजाभवानी मंदिरात आ. जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली शहराध्यक्ष आनंद परांजपे यांच्या नेतृत्वाखाली तसेच ॠता आव्हाड यांच्या उपस्थितीमध्ये महाआरती करण्यात आली. पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारतीय हवाई दलाचे मिग २१ विमान कोसळले असून या विमानातील विंग कमांडर अभिनंदन वर्थमान यांना पाकच्या लष्कराने आपल्या ताब्यात घेतले आहे. त्यांना मारझोड करण्याचा व्हीडीओही जारी करण्यात आलेला आहे. पाकच्या ताब्यातून त्यांची विनाइजा सुटका व्हावी, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने ही महाआरती केली. या महाआरतीला सर्वधर्मीय नागरिक -कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या महाआरतीला महिलांची संख्या लक्षणीय होती. यावेळी कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्तपणे ‘भारतमाता की जय, वंद मातरम, जय जवान.. जय किसान अशा घोषणा दिल्या. या महाआरतीच्या दरम्यान अनेक कार्यकर्त्यांनी आपल्या हातामध्ये अभिनंदन वर्थमान यांचे छायाचित्र तसेच भारताचा राष्ट्रध्वज घेतले होते. यावेळी कार्यकर्त्यांनी जवानांच्या सुरक्षेसाठीही तुळजाभवानीकडे करु णा भाकली.यावेळी बोलताना आनंद परांजपे यांनी, विंग कमांडर अभिनंदन वर्थमान हे पाकिस्तानच्या हल्लेखोर विमानांना परतवून लावताना पाकच्या ताब्यात सापडले आहेत. त्यामुळे त्यांना सोडवून मायदेशी आणण्यास मोदी सरकारने प्राथमिकता दिली पाहिजे. त्यासाठी राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय पातळीवर जेवढे प्रयत्न करणे शक्य आहेत, तेवढे प्रयत्न करावेत, पाकिस्तानवर दबाव निर्माण करावा, असे सांगितले.