उल्हासनगर : राष्ट्रवादी काँग्रेसच्या बहुतांश नगरसेवकांनी ओमी कलानी यांच्या नेतृत्वाखाली भाजपाप्रणीत आघाडीत प्रवेश केल्याने राष्ट्रवादीच्या आमदार ज्योती कलानी यांनी शहर जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देऊ केला होता. मात्र, अस्तित्वाकरिता धडपडणाऱ्या राष्ट्रवादीचा ज्योती कलानी हाच आधार असल्याने पक्षाने त्यांचा राजीनामा तर फेटाळलाच, पण निवडणूक पोस्टरवर त्यांचीच छबी लावून मते मागण्याचा निर्णय घेतला आहे. परिणामी, पक्ष ओमींसोबत भाजपाच्या दावणीला व त्यांच्या मातोश्री राष्ट्रवादीसोबत, असे विसंगत चित्र निर्माण झाले आहे.उल्हासनगर म्हणजे कलानी व कलानी म्हणजेच राष्ट्रवादी, असे राजकीय समीकरण असलेल्या या महापालिकेत राष्ट्रवादीची दैना झाली आहे. ओमी हे आपल्या समर्थक नगरसेवकांना घेऊन भाजपाप्रणीत उल्हासनगर विकास आघाडीत सहभागी झाले आहेत. भाजपा ओमी यांना ‘कमळ’ चिन्हावर निवडणूक लढवण्यास भाग पाडत आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादीचे घड्याळ मोडून पडले आहे. उल्हासनगरात कलानी कुटुंब हेच राष्ट्रवादीचे नेतृत्व करीत असल्याने ज्योती कलानी यांनी पक्षाच्या पदाचा दिलेला राजीनामा फेटाळण्याची नामुश्की राष्ट्रवादीवर आली. एवढेच नव्हे, तर ज्योती यांची छबी असलेली पोस्टर्स छापून त्यांच्या नावावर मते मागण्याची लाचारी राष्ट्रवादीवर आली आहे. उल्हासनगरातील कुप्रसिद्ध डॉन पप्पू कलानी व शरद पवार यांचे संबंध जगजाहीर आहेत. राष्ट्रवादीची सर्व सूत्रे कलानी कुटुंबाकडे दिल्याने ते सांगतील ती पूर्व दिशा, हे ठरलेले होते. भठिजा बंधूंच्या हत्याकांडप्रकरणी पप्पू जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. कलानी कुटुंबाकरिता हा संकटाचा काळ सुरू असतानाही पवार कलानी कुटुंबाच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिले. त्यांनी ज्योती यांना विधानसभेची उमेदवारी दिली. त्यांच्या प्रचाराकरिता गोलमैदानात सभा घेतली. मोदीलाट असतानाही ज्योती निवडून आल्या. मात्र, आता पुत्र ओमी यांनी भाजपाची साथसंगत केल्याने राष्ट्रवादीचे अस्तित्व पुसले गेले आहे.ओमी भाजपासोबत जाणार नाहीत, असे छातीठोक दावे करणारे प्रमोद हिंदुराव हे अद्याप धक्क्यातून सावरलेले नाहीत. पक्ष निरीक्षक सुधाकर वढे, माजी नगरसेवक भरत गंगोत्री अशी उरल्यासुरल्यांची मोट बांधून निवडणुका लढवण्याची धडपड राष्ट्रवादीचे नेते करीत आहेत. अन्य पक्षांतील बंडखोरांना गळाला लावून ज्योती कलानी यांच्या पोस्टरवरील फोटोंचा आधार घेऊन मतांचा जोगवा मागण्याचा प्रयत्न सुरू आहे. (प्रतिनिधी)
राष्ट्रवादीला कलानी कुटुंबाचा मोह सुटेना
By admin | Published: February 02, 2017 3:09 AM