जितेंद्र कालेकर/कुमार बडदे
ठाणे/मुंब्रा : राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात दाखल केलेला विनयभंगाचा गुन्हा रद्द करण्यात यावा. ज्या महिलेने गुन्हा दाखल केला आहे, त्या महिलेने काही दिवसांपूर्वी शिवा जगताप तसेच अन्य काही जणांना शंकर मंदिरात प्रवेश करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला होता. त्याबद्दल त्या महिलेविरोधात ॲट्रासिटीचा गुन्हा दाखल करण्यात यावा, या मागणीसाठी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी मुंब्रा पोलिस ठाण्याच्या परिसरात सोमवारी ठिय्या आंदोलन केले. आव्हाड यांच्या पत्नी ऋता यांनीही हा गुन्हा दाखल झाल्याबद्दल तीव्र संताप व्यक्त करत आंदोलनात सहभाग घेतला.
आव्हाड यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर सोमवारी पहाटेपासूनच ठाणे, कळवा, मुंब्रा आणि कौसा भागातील अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी मुंब्रा पोलीस ठाण्यात धडक दिली. या पोलीस ठाण्याबाहेरच रिक्षाचालकांनी पोलीस ठाण्याचे प्रवेशद्वार काही काळ अडवून धरले होते. राष्ट्रवादीचे विधानसभा क्षेत्र अध्यक्ष शमिम खान, माजी विरोधी पक्षनेते अशरफ ऊर्फ शानू पठाण, ब्लॉक अध्यक्ष बबलू शेमना, युवती विभागाच्या अध्यक्षा पल्लवी जगताप यांच्यासह पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांनी मुंब्रा पोलीस ठाण्याच्या परिसरात घोषणाबाजी करत ठिय्या आंदोलन केले.
ह्यसरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती हैह्य, ह्यशिंदे सरकार हाय हाय...ह्ण अशी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. आव्हाड यांच्या पत्नी ऋता याही काहीकाळ यामध्ये सहभागी झाल्या होत्या. हे आंदोलन मागे घ्यावे, यासाठी ऋता आव्हाड यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांची साहाय्यक पोलीस आयुक्त सोनाली ढोले तसेच पोलिस अधिकारी समजूत काढत होते.राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक कोंडी
आक्रमक झालेल्या संतप्त पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी रेती बंदर आणि पोलिस ठाण्यासमोर टायर जाळून काही काळ वाहतूक रोखून धरली होती. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ वर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. सकाळी काही काळ येथील रिक्षा बंद ठेवण्यात आल्या होत्या. त्यामुळे रिक्षाने प्रवास करणारे विद्यार्थी, नोकरदारांना पायी रेल्वे स्थानक गाठावे लागले.