ठाणे : कल्याण लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार विद्यमान खा.डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याविरोधात लढण्याकरिता राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने ठाणे जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष व हॉटेल व्यावसायिक बाबाजी पाटील यांच्या नावाची शिफारस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे केली आहे. लोकसभा निवडणुकीत शिवसेनेसोबत युती करण्याकरिता भाजपाचे कसोशीने प्रयत्न सुरू असल्याने सेनेचे शिंदे यांच्याविरुद्ध राष्ट्रवादीचे पाटील अशी थेट लढत होईल, अशी शक्यता व्यक्त होत आहे.डॉ. शिंदे यांच्याविरोधात कोण निवडणूक लढवणार, याबाबत राजकीय वर्तुळात वेगवेगळे तर्कवितर्क केले जात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमधून गणेश नाईक, जितेंद्र आव्हाड यांची नावे चर्चिली गेली. राष्ट्रवादीचे नेते आनंद परांजपे यांचेही नाव याच मतदारसंघाकरिता घेतले जाते. मात्र, ते राष्ट्रवादीतून लढणार की पक्षांतर करून, याबाबत बराच काथ्याकूट झाला आहे. मात्र, राष्ट्रवादीच्या एका बड्या नेत्याने सांगितले की, डॉ. शिंदे यांच्याविरुद्ध लढण्याकरिता पक्षाने बाबाजी पाटील यांच्या नावाची शिफारस केली आहे. अर्थात, पक्षश्रेष्ठी योग्यवेळी याबाबत निर्णय घेतील.बाबाजी पाटील हे ठाणे जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष आहेत. त्यांचे वडील बा.का. पाटील यांनी ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवरील आर.सी. पाटील यांची सत्ता उलथवून लावली होती. कालांतराने त्यांचे निधन झाल्यावर बाबाजी पाटील हे अध्यक्ष झाले.सुमारे दीड वर्षापूर्वी आ. हितेंद्र ठाकूर यांच्या वसई विकास आघाडीने बाबाजी पाटील यांच्या पॅनलला अल्पमतात आणले. कुणबी संचालकांच्या पाठिंब्यावर राजेंद्र पाटील जिल्हा बँकेचे अध्यक्ष झाले. सध्या बाबाजी पाटील हे मुंब्रा-कौसा प्रभागातून विजयी झाले आहेत. हॉटेल व्यावसायिक असलेले पाटील हे डॉ. शिंदे यांच्यासमोर आर्थिकदृष्ट्या सक्षम उमेदवार असल्याचे राष्ट्रवादीच्या नेत्यांचे म्हणणे आहे.>युती भाजपासाठी सोयीचीलोकसभेसाठी भाजपाला युती हवीच आहे. त्यामुळे रवींद्र चव्हाण किंवा अन्य पक्षातून एखाद्याला आयात करून डॉ. शिंदे यांच्यासमोर लढवण्याची वेळ भाजपावर येणार नाही. मनसेने कमकुवत उमेदवार दिल्यास शिवसेनेविरुद्ध राष्ट्रवादी असाच सामना रंगेल, असा पक्षाच्या नेत्यांना विश्वास वाटतो.
शिंदे यांच्याविरुद्ध राष्ट्रवादीचे पाटील?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2018 12:52 AM