लोकमत न्यूज नेटवर्कभार्इंदर : पक्षाला लागलेल्या गळतीत बहुतांश नगरसेवकांनी बाहेरची वाट धरल्यानंतर, गिल्बर्ट मेन्डोन्सा यांनी पक्षाला रामराम ठोकल्यावर राष्ट्रवादीतील उरलीसुरली नेतेमंडळीही बाहेर पडली. पालिका निवडणुकीत पक्ष म्हणून राष्ट्रवादी फारशी चमकदार कामगिरी करेल, अशी शक्यता मावळल्यानंतरही पक्षाचे नेते लक्ष देत नसल्याने ज्यांनी पक्ष सोडण्याचा इशारा दिला होता, त्यांच्याच नाकदुऱ्या काढून अखेर राष्ट्रवादीतील वाद संपल्याचे जाहीर करण्यात आले. जे उरले त्यांना निष्ठावंत असे संबोधून गटबाजी करणाऱ्यांना ‘चालते व्हा’ असा इशारा देत पक्षाच्या नेत्यांनी ऐक्यावर शिक्कामोर्तब केले. सध्याचे जिल्हाध्यक्ष जयंत पाटील यांनी गटबाजी संपल्याचे आणि पक्ष सोडणार नसल्याचे जाहीर केले असले तरी अन्य गटांनी मात्र पाटील यांना हटवण्याची भूमिका मांडली आहे. ती मान्य न झाल्यास त्यासाठी येत्या दोन दिवसात पत्रकार परिषद घेतली जाणार असून त्यात ही मागणी मांडली जाणार आहे. पाटील हेच पक्षविरोधी कारवाया करीत असून त्यांना पदावरून दूर केल्याशिवाय पक्ष टिकणे अवघड असल्याचे म्हणणे या नेत्यांनी मांडले. पक्षाचा प्रभाव न उरल्याने, उमेदवारांची शोधाशोध करण्याची वेळ येणार असून निवडणुकीसाठी खर्च करण्यास एकही नेता पुढे येत नसल्याने पक्षातील उरल्यासुरल्या नेत्यांनीही पक्ष सोडण्याचा इशारा दिला होता. तो जाहीररित्या सर्वत्र छापून आल्याने वरिष्ठांनी धावपळ करत त्यांची समजूत काढली आणि इशारा देणाऱ्यांनीच गटबाजी करणाऱ्यांना चालते व्हा असे सांगत सारे आलबेल असल्याचा इशारा दिला. राष्ट्रवादीबाबत प्रसिद्ध झालेल्या बातम्यांना गटबाजीत समाधान मानणारे नेते कारणीभूत असल्याचा ठपका ठेवण्यात आला. त्यांच्या एकाधिकारीशाहीमुळेच पक्षाची पडझड होऊ लागल्याचे मत निष्ठावंतांनी मांडले, पण हे नेते कोण ते मात्र जाहीर करण्यात आले नाही.जिल्हाध्यक्षपद रिक्त झाल्याने निष्ठावंतांनी ज्येष्ठ राजकीय व्यक्तिमत्व व माजी उपमहापौर जयंत पाटील यांचे नाव सुचविले. त्याला वरिष्ठांकडून मान्यता मिळाली. पण त्यानंतर पक्षात अस्वस्थता वाढली. ज्यांनी पाटील यांना विरोध केला, त्यांच्या कारवाया थांबत नसल्याने पाटील यांनी पक्ष सोडण्याचा इशारा दिला. त्यांच्या राजीनाम्याचा इशारा जाताच वरिष्ठांनी विनवण्या करत रविवारी बैठक घेतली.त्या बैठकीनंतर पक्षातीलच काही वरिष्ठ आणि निष्ठावंतांची दुसरी बैठक पार पडली. त्यात पक्षाच्या वाताहतीला जबाबदार ठरणाऱ्यांनी चालते व्हावे, असा इशारा दिला. कोणत्याही परिस्थितीत राष्ट्रवादी संपवू देणार नसल्याचा निर्धार करण्यात आला. यामुळे काही दिवसांपासून राष्ट्रवादीत सुरू असलेल्या अस्वस्थतेच्या नाट्यावर पडदा पाडण्याचा प्रयत्न करण्यात आला. पाटील यांना रोखण्यात यश आल्याचे पक्षाने जाहीर केले, पण त्याच्यामुळेच पक्षातील नेते बाहेर पडत असल्याचे सांगत दुसऱ्या गटाने त्यांच्याकडे जिल्हाध्यक्षपद ठेवण्यास विरोध केला आहे. त्यामुळे दोन दिवसात नेतृत्त्वबदल न झाल्यास असंतुष्टांनी पक्ष सोडण्याचा किंवा बंडाचा पवित्रा घेण्याचे जाहीर केले आहे.
राष्ट्रवादीतील बंड शमता शमेना
By admin | Published: June 27, 2017 3:08 AM