अनिकेत घमंडी, डोंबिवलीकेडीएमसीच्या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आघाडी झाली असली तरीही त्यांच्यात समन्वयाचा अभाव आहे. त्यामुळेच जेथे काँग्रेसचा दावा आहे, अशा ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांचे बंडखोर उभे केल्याचा दावा पक्ष निरीक्षक संजय चौपाने यांनी केला आहे. महापालिका क्षेत्रातील सुमारे १८ हून अधिक ठिकाणी असे उमेदवार उभे असल्याने काँग्रेसमध्ये अस्वस्थता असून यासंदर्भात ते प्रांताध्यक्षांशी चर्चा करणार आहेत. राष्ट्रवादीने अपक्ष उमेदवार उभे केल्याने मोठी अडचण झाल्याचे ते म्हणाले. काँग्रेसने मात्र असे कुठेही केले नाही. आम्ही शब्द पाळला तर त्यांनी का नाही, अशी चर्चा सुरू आहे. >> या ठिकाणी उभे केलेत बंडखोर : १०, १०३, ९२, ९६, ७, ३६, ९९ हे प्रभाग तर काँग्रेसचे असतानाही या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसने ‘बी’ फॉर्म दिल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे तेथे साहजिकच काँग्रेसच्या उमेदवाराला त्रास होणार. त्याचा फटकाही बसू शकतो. तसेच अपक्ष म्हणून ८०, २, १८, ६४, ९४, ८, ३०, ९३, १२, ९१ या ठिकाणी त्यांचे उमेदवार उभे राहिल्याचे ते म्हणाले.>>सचिन पोटे यांचा अर्ज आधीच बाद झाल्याने पक्षाची तेथे हानी झाली आहे. त्यामुळेही पक्षश्रेष्ठी व्यथित असताना आघाडीचा घटक म्हणवणाऱ्या राष्ट्रवादीने असे केल्याने काँग्रेससमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. त्यासंदर्भात दोन्ही पक्षांच्या प्रांताध्यक्षांची भेट होणार असून बैठक होणार आहे. त्यात सर्व वस्तुस्थिती मांडण्यात येणार असून राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांचे उमेदवार मागे घ्यावेत, यासंदर्भात महत्त्वाची चर्चा करण्यात येणार आहे. >>यासंदर्भात माजी खासदार संजीव नाईक यांच्यासह सिडकोचे माजी अध्यक्ष प्रमोद हिंदुराव यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु ते व्यस्त असल्याने तो होऊ शकला नाही.
आघाडी असूनही राष्ट्रवादीची बंडखोरी?
By admin | Published: October 16, 2015 2:01 AM