- कुमार बडदे मुंब्रा : कब्रस्तानच्या मुद्यावर झालेल्या चर्चेच्या बैठकीत गेलेल्या राष्ट्रवादीच्या नगरसेवकाला सदस्यत्वाचा राजीनामा देण्याचे निर्देश ठाणे शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांनी दिल्याची चर्चा आहे. यामुळे राष्ट्रवादीच्या नगरसेवकांमध्ये खळबळ उडाली आहे.अपक्ष म्हणून निवडून आलेले नगरसेवक विश्वनाथ भगत यांच्या घरी नुकताच एका कार्यक्र म आयोजित करण्यात आला होता. त्या बैठकीला खासदार श्रीकांत शिंदे, माजी नगरसेवक सुधीर भगत, महेद्र कोमुर्लेकर, एमएमआयचे नगरसेवक शाह आलम, राष्ट्रवादीचे नगरसेवक जफर नोमाणी तसेच कार्यकर्ते रातु अन्सारी याचप्रमाणे समाजवादी पक्षाचे स्थानिक नेते हजर होते. येथील नियोजित कब्रस्तानच्या जागेत बदल करण्यात आल्यामुळे राष्ट्रवादी तसेच इतर पक्षांमध्ये या विषयावर परस्पर दावे- प्रतीदाव्यांमुळे मागील काही दिवसांपासून वाद सुरू आहेत. त्यामुळे भगत यांच्या घरी झालेल्या कब्रस्तानच्याच्या मुद्दावरील चर्चेच्या बैठकीला जावून नोमाणी यांनी पक्षविरोधी काम केल्याचा समज झाल्यामुळे परांजपे यांनी त्यांना राजीनामा देण्याचे निर्देश सोशल मिडीयाच्या माध्यमातून दिले आहेत.>या बैठकीत ज्या वेळी कब्रस्तानच्या विषयावर चर्चा सुरू झाली तेव्हा मी तेथे हजर नव्हतो. परांजपे यांनी चुकीच्या माहितीच्या आधारे मला राजीनामा देण्याचे निर्देश दिले आहेत. पक्ष जी काही चौकशी करेल, त्या चौकशीला मी तयार आहे.- जफर नोमाणी,नगरसेवक, राष्ट्रवादी>शिवसेना खासदाराच्या नेतृत्त्वाखाली झालेल्या मुंब्य्रात झालेल्या बैठकीत श्रेष्ठींना विचारात न घेता दोन नगरसेवक उपस्थित होते. हे पक्ष शिस्तीला धरून नाही. त्यांना सेनेत जायचे असेल तर खुशाल जावे, त्याआधी त्यांनी राजीनामा द्यावा. तसे निर्देश अध्यक्ष म्हणून मी सोशल मीडियाद्वारे नोमाणी यांना दिले आहेत.- आनंद परांजपे, अध्यक्ष,ठाणे शहर राष्ट्रवादी काँगे्रस
नगरसेवकाला राजीनामा देण्याचे निर्देश, राष्ट्रवादीत खळबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2018 3:40 AM