डोंबिवली: सर्वाधिक गर्दीचे स्थानक ओळखल्या जाणा-या डोंबिवली रेल्वे स्थानकामध्ये महिला रेल्वे प्रवाशांना सुविधा नसल्याने त्यांना प्रवासादरम्यान प्रचंड गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. विशेषत: त्यांना सकाळी गर्दीच्या वेळेत महिला विशेष लोकल डोंबिवली स्थानकातून सोडण्यात यावी. तसेच स्वतंत्र स्वच्छतागृह देखिल असावे. त्यांसह दिव्यांगाच्या समस्या, प्रथमोपचाराची समस्या, महिला रेल्वे पोलिसांच्या समस्या निदर्शनास आल्याने प्रवाशांना आवश्यक त्या सुविधा तातडीने न दिल्यास राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला.पक्षाचे प्रवक्ते महेश तपासे यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह रेल्वे प्रवासी संघटनेच्या महिला, पुरूष पदाधिका-यांसमवेत शुक्रवारी रेल्वे स्थानकाचा पाहणी दौरा केला. त्यावेळी त्यांना अनेक गैरसोयींचे स्थानक असल्याचे नीदर्शनास आले. फलाट क्रमांक १ वरील स्थानक प्रबंधक के.ओ. अब्राहम यांच्यासमवेत त्यांनी स्थानकातील सुविधा, गैरसोयीसंदर्भात चर्चा केली. त्यानंतर स्थानकाच्या पाहणी दौ-यात त्यांच्या नीदर्शनास अनेक गैरसोयी आल्या. त्यावर त्यांनी प्रवाशांच्या दृष्टीने आवश्यक असणा-या सुविधा मिळणार नसतील तर एवढ्या मोठ्या प्रमाणावर प्रवासी तिकिट, पास काढतात त्या निधीतून त्यांच्या पदरी काहीही पडत नसल्याने नाराजी व्यक्त केली. स्थानकात स्वच्छतागृहांमध्ये अस्वच्छता, फलाटावर भटके कुत्रे असल्याने प्रवाशांना त्रास, तिकिट घरांमध्ये ताटकळणारे प्रवासी, दिव्यांगांच्या डब्या समोर आवश्यक असणारे रॅम्प, सूचना तसेच अन्ये असुविधांमुळे प्रवासी त्रस्त असल्याचे जाणवले.स्थानकातील अत्यावश्यक उपचार केंद्र तीन महिन्यांपासून बंद असल्याने त्यांनी संताप व्यक्त केला. तो विभाग १ तारखेपासून पुन्हा सुरू होणार असून तांत्रिक बाबींमुळे बंद असल्याचे रेल्वेने सांगितले. तसेच स्थानकातील रुग्णवाहीका उपलब्ध नव्हती, पण फोन केल्यावर तातडीने १० मिनिटात उपलब्ध झाल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. ज्येष्ठ नागरिकांना होणारा त्रास एका प्रवाशाने सर्वांसमोर व्यक्त केला. स्थानकातील आरपीएफ, जीआरपी पोलिसांच्या समस्यांचा त्यांनी आढावा घेतला. महिला आरपीएफना चेंज रूम, तसेच त्यांचे सामान ठेवण्यासाठी पुरेसी जागा नसणे, लोहमार्ग पोलिसांच्या समस्यांबाबत चर्चा केली. महिला आरपीएफच्या समस्या जाणवल्यावर एनसीपीचे कार्यकर्ते त्यांना एक कपाट देणार असल्याचे सांगण्यात आले.
कल्याण येथे रेल्वे न्यायालय आहे. पण ते न्यायालय गुन्ह्यांच्या वाढत्या समस्येपुढे तोकडे आहे. ते तातडीने वाढवण्यात यावे, सध्या त्या न्यायालयावर ठाणे ते लोणावळा स्थानकांचा भार आहे. पण मोबाइल चोरी, बॅग चोरी, यासह भांडण, हाणामा-या आदी समस्या नित्याच्या असून त्याचे गुन्हे स्थानकांप्रती वाढत आहेत. त्यापुढे सध्याचे न्यायालय अपुरे पडत असून प्रचंड ताण आहे. त्यात पोलिसांचा वेळ जातो, त्याचा परिणाम कामावर होतो. प्रवाशांच्या सुरक्षेवर होतो हे गंभीर आहे. त्यासंदर्भात तपासे हे मंत्रालयातील गृहखात्याशी, आणि विधि विभागाशी पत्रव्यवहार करणार असल्याचे म्हणाले. वाहनतळाच्या ठिकाणीही प्रवाशांची गैरसोय होत असल्याचे ते म्हणाले.
स्थानक प्रबंधक के.अब्राहम यांनी आतापर्यंत प्रवाशांच्या तक्रारी अर्जांसंदर्भात वरिष्ठांना काय अहवाल दिला, यााबतची माहिती विचारली असता ते निरूत्तर झाले. तसेच वरिष्ठ त्यावर निर्णय घेतात, आम्ही सर्व मागण्या वरिष्ठांकडे पाठवतो त्यानंतर त्यात अमुलाग्र बदल करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो असे स्पष्टीकरण देण्यात आले. बदल करण्याची मानसीकता ही केवळ कागदोपत्री असल्याबद्दलही तपासे यांनी नाराजी व्यक्त केली. एकंदिरतच प्रवाशांच्या गैरसोयींबाबत मध्य रेल्वेच्या डिआरएम ना पुढील आठवड्यात निवेदन देण्यात येणार असून त्यांची भेट घेत चर्चा करणार असल्याचे तपासे म्हणाले.