ठाणे : ठाणे महापालिकेत प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अंतर्गत धुसफूस कायम असून नुकत्याच झालेल्या ठाणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेतील अर्थसंकल्पाच्या अंमलबजावणीच्या मुद्यावरून पुन्हा एकदा हे स्पष्ट झाले आहे. अर्थसंकल्पाला मंजुरी मिळून साडेपाच महिने उलटून गेल्यानंतरही त्याची अंमलबजावणी गेल्या आठवड्यापासून सुरू झाल्याने भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या टार्गेटवर प्रशासन असले, तरी अर्थसंकल्पाच्या ठरावावर महापौर, सभागृह नेते आणि विरोधी पक्षाच्या सह्यादेखील असल्याने राष्ट्रवादीतील एका गटाने एक प्रकारे स्वपक्षालाच अप्रत्यक्षपणे टार्गेट केल्याचे यानिमित्ताने उघड झाले आहे.महापालिकेत शिवसेनेनंतर दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे पाहिले जाते. मात्र, येणाºया निवडणुका लक्षात घेऊन पक्षवाढीसाठी काही हालचाली होत नसल्याचा आक्षेप घेऊन राष्ट्रवादीतीलच काही नगरसेवकांनी ठाण्यातील पक्ष नेतृत्वाविरोधात दंड थोपटले आहेत. विरोधकांचा हा गट आमदार जितेंद्र आव्हाड, शहराध्यक्ष आनंद परांजपे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील यांच्याविरोधात सक्रिय झाला आहे. आव्हाड आणि परांजपे यांच्याबाबत नुकतीच गटाने राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन ठाण्यातील सर्व परिस्थितीचा पाढा वाचला असला, तरी शहराध्यक्ष परांजपे यांची आता प्रवक्तेपदीदेखील निवड केली असल्याने विरोधी गटाला हा झटका मानला जात आहे. शरद पवार यांच्या भेटीनंतर ही धुसफूस कमी होईल, अशी अपेक्षा होती.मात्र, तसेही काही झाले नसून पक्षातील विरोधाची धार अधिक वाढली असल्याचे नुकत्याच झालेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेतील अर्थसंकल्पाच्या गोंधळावरून स्पष्ट झाले आहे.महापालिकेच्या अर्थसंकल्पाला मंजुरी मिळून साडेपाच महिने होऊनही त्याच्या अंमलबजावणीला गेल्या आठवड्यापासून सुरु वात झाल्याचे सर्वसाधारण सभेत उघड झाले. मात्र, याबाबत भाजपा तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक अनभिज्ञ असल्याचा आरोप भाजपाबरोबरच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी यावेळी केला. हा विलंब का झाला, याचे स्पष्टीकरण देऊन सभागृह नेते नरेश म्हस्के यांनी वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. त्यावरून अधिकच वादंग निर्माण झाले. ठाण्यात राजकीय वातावरण तापू लागले आहे.>विरोधी पक्षनेत्याने भूमिका घेतली नाहीराष्ट्रवादीच्या वतीने गटनेते हणमंत जगदाळे आणि नजीब मुल्ला यांनी या मुद्यावरून प्रशासनाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, तेव्हा विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील यांनी पक्षातील नगरसेवकांबाबत कोणतीही भूमिका घेतली नाही. नगरसेवकांची कामे लवकर व्हावी, यासाठी अर्थसंकल्पाची अंमलबजावणी लवकर करावी, अशी मागणी त्यांनी केली. त्याची अंमलबजावणी होत असताना महापौर, विरोधी पक्षनेते आणि सभागृह नेते यांना अवगत असायला हवे, ही अपेक्षा आहे.विरोधी पक्षातील नगरसेवकांना अंमलबजावणीबाबत माहिती नसणे, याबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत असून त्यातूनच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात काहीही आलबेल नसल्याचे यानिमित्ताने समोर आले आहे. पालिका वर्तुळात सध्या याचीच चर्चा सुरू आहे.
अर्थसंकल्पावरून राष्ट्रवादीच्या एका गटाकडून नेतेच टार्गेट?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2018 3:14 AM