ठाणे: रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे ठाणे शहर आणि परिसरात गेल्या काही दिवसांपासून प्रचंड वाहतूककोंडी होत आहे. या वाहतूककोंडीच्या त्रासाला ठाणेकरांना सामोरे जावे लागत आहे. या रस्त्यांच्या दुरुस्तीची जबाबदारी राज्य रस्ते विकास महामंडळाची (एमएसआरडीसी) असल्याने त्यांनी तत्काळ रस्त्यांची दुरुस्ती करावी. जोपर्यंत रस्त्यांची दुरुस्ती होत नाही, तोपर्यंत शहरातून होणारी अवजड वाहतूक थांबवावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे. आठ दिवसांत याबाबत योग्य निर्णय न घेतल्यास राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक भूमिका घेऊन ठाण्यात येणारी अवजड वाहतूक बंद पाडेल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहराध्यक्ष माजी खासदार आनंद परांजपे आणि ठामपा गटनेते नजीब मुल्ला यांनी गुरुवारी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना दिला आहे.
रस्त्यावरील खड्ड्यांमुळे गेल्या काही दिवसांपासून ठाणे शहरातील वाहतूककोंडीमध्ये प्रचंड वाढ होत आहे. या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहराध्यक्ष परांजपे आणि ठाणे महापालिकेचे गटनेते नजीब मुल्ला यांनी पालकमंत्र्यांना निवेदन दिले आहे.
या संदर्भात परांजपे यांनी ठाणे शहरातील रस्त्यांची निगा राखण्याची जबाबदारी एमएसआरडीसीकडून पार पाडली जात नाही. महापौर रात्रीच्या अंधारात गणेशोत्सवाचे विसर्जन होत असताना साचलेल्या पाण्यामध्ये डांबर टाकून खड्डे बुजवायचा प्रयत्न करीत होते. ठाण्यात मेट्रोची कामे सुरू आहे. ठाण्यातील उड्डाणपुलांवर खड्डे आहेत. हे उड्डाणपूल एमएसआरडीसीचे आहेत. ठामपा आणि एमएसआरडीसीमध्ये ताळमेळ नाही. हाय-वे ची जबाबदारी एसआरडीसीकडे आणि अंतर्गत रस्त्यांची जबाबदारी ठामपाकडे आहे. एमएसआरडीसी खाते शिवसेनेकडे असल्यामुळे या खड्ड्यांची जबाबदारीही शिवसेनेचीच आहे.
पालकमंत्र्यांनी स्वत: लक्ष घालून ठाणेकरांची वाहतूककोंडीतून मुक्तता करावी; अन्यथा, मुलुंड टोलनाका, खारीगावा टोलनाका आणि गायमुख या तिन्ही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते ठाण्यात येणारी अवजड वाहनांची वाहतूक रोखून धरतील, असा इशारा परांजपे यांनी दिला.