बदलापूर - बदलापूर आणि वांगणी दरम्यान पुरात अडकलेल्या महालक्ष्मी एक्स्प्रेसमधून प्रवाशांच्या सुटकेसाठी युद्धपातळीवर मदतकार्य सुरू असून सर्व प्रवाशांची सुखरुप सुटका करण्यात आली आहे. प्रवाशांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले असून त्यांच्या जेवणाची आणि वैद्यकीय तपासणीची व्यवस्था करण्यात आली आहे. 1 हजार 50 प्रवाशांची सुखरुप सुटका करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
14 बस आणि 3 टेम्पोद्वारे प्रवाशांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे. तसेच महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये अडकलेल्या 9 गर्भवती महिलांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. 37 डॉक्टरांसह रूग्णवाहिकाही तैनात करण्यात आल्या आहेत. त्यात स्त्रीरोगतज्ञांचाही समावेश आहे. सह्याद्री मंगल कार्यालय येथे सर्वांची राहण्याची व्यवस्था करण्यात आली असून तेथेच भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.
महालक्ष्मी एक्स्प्रेसच्या बचावकार्यावर लक्ष ठेवण्याचे मुख्यमंत्र्यांनी मुख्य सचिवांना आदेश दिले आहेत. मुसळधार पावसामुळे बदलापूर, वांगणी परिसरात मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली असून, रेल्वेरूळ पाण्याखाली गेल्याने महालक्ष्मी एक्स्प्रेस बदलापूर-आणि वांगणी स्थानकांमध्ये काल रात्रीपासून अडकली आहे.
प्रवाशांची सुटका करण्यासाठी एनडीआरएफच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत प्रवाशांना बाहेर काढण्यास सुरुवात केली आहे. सर्व प्रवाशांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात आले आहे. या प्रवाशांना बदलापूर येथे नेण्यात येणार असून, तेथून त्यांना त्यांच्या घरांकडे रवाना करता येईल. ज्या प्रवाशांना कोल्हापूरला जायचे आहे, अशा प्रवाशांसाठी कल्याण येथून विशेष ट्रेन सुटणार आहे. बदलापूर, वांगणी परिसरात मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. रेल्वेरूळ पाण्याखाली गेल्याने महालक्ष्मी एक्स्प्रेस बदलापूर-आणि वांगणी स्थानकांच्यामध्ये अडकली आहे.
बदलापूर आणि वांगणीच्या दरम्यान कासगाव जवळ महालक्ष्मी एक्सप्रेस थांबवण्यात आली आहे. एक्स्प्रेस जवळ चार ते पाच फूट पाणी साचल्याने ही एक्सप्रेस काजगाव जवळील रेल्वे रुळावर उभी करण्यात आली आहे. रेल्वेमध्ये अडकलेल्या प्रवाशांच्या मदतीसाठी एनडीआरएफचे पथक दाखल झाले आहे. तसेच प्रवाशांसाठी खाद्यपदार्थ आणि इतर जीवनावश्यक वस्तू पाठवण्यात आल्या आहेत. माटुंगा, वरळी, लालबाग, लोअर परेल परिसरात पाऊस सुरू आहे. पुर्व आणि पश्चिम उपनगरात मुसळधार पावसाने मुंबईकरांचे हाल झालेत. तर ठाणे, कल्याण, डोंबिवली परिसरात जोरदार पाऊस पडत आहे.
मुसळधार पावसामुळे अंबरानाथमधील ऐतिहासिक शिवमंदिर परिसर जलमय झाला आहे. शिवमंदिरातही पाणी शिरले आहे. पुणे-एर्नाकुलम एक्स्प्रेस पनवेल स्थानकात थांबवण्यात आली आहे. तसेच 27 जुलै रोजी सुटणारी पुणे-एर्नाकुलम एक्स्प्रेस आणि 29 जुलै रोजी सुटणारी एर्नाकुलम-पुणे एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे. मुंबईतील मुसळधार पावसाचा हवाई वाहतुकीला फटका, सात विमाने रद्द, 8 ते 9 विमानांचा मार्ग बदलला आहे. गेल्या 24 तासांत मुंबई आणि उपनगरात 150 ते 180 मिमी पाऊस झाला असून दिवसभरातही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.