कल्याण : केडीएमसीतील २७ गावांची स्वतंत्र नगरपालिका स्थापन करावी, या मागणीसाठी सरकारदरबारी आपण आग्रही असल्याचे मनसेचे आमदार प्रमोद (राजू) पाटील यांनी सर्वपक्षीय संघर्ष समितीने घेतलेल्या जाहीर सभेत स्पष्ट केले असताना आता राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक नेते डॉ. वंडार पाटील आणि राष्ट्रवादी युवक काँग्र्रेसचे जिल्हाध्यक्ष सुधीर पाटील यांनीही राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांना गावे वगळण्याबाबत निवेदन पाठविले आहे. गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याकडे हे निवेदन देण्यात आले.
कल्याण तालुक्यातील २७ गावांचा विकास करण्यासाठी ही गावे केडीएमसीत समाविष्ट करण्यात आली. परंतु, महापालिकेचा नियोजनशून्य कारभार, भ्रष्टाचार, मालमत्ता वाढीव कर व शेतजमिनींवरील आरक्षणाच्या मुद्यावर अनेक वर्षांच्या संघर्षानंतर १२ जुलै २००२ ला ही गावे महापालिकेतून वगळून ग्रामपंचायती स्थापन झाल्या. परंतु, राज्य सरकारच्या १४ मे २०१५ च्या अधिसूचनेनुसार ही २७ गावे कुणाचीही मागणी नसताना पुन्हा केडीएमसीत समाविष्ट करण्यात आली. तत्पूर्वी २७ गावांतील ग्रामपंचायतींच्या ग्रामस्थांनी ठरावांद्वारे या महापालिकेस कडाडून विरोध केला होता, याकडे निवेदनात लक्ष वेधण्यात आले आहे.
२७ गावांची स्वतंत्र नगरपालिका व्हावी, यासाठी ७ सप्टेंबर २०१५ ला अधिसूचना प्रसिद्ध झाली होती. त्यावेळी हजारोंच्या संख्येने सूचना प्राप्त झाल्या होत्या. मात्र, विभागीय आयुक्तांनी आजपर्यंत सुनावणी न घेतल्यामुळे स्वतंत्र नगरपालिकेचा विषय प्रलंबित राहिला आहे. या अधिसूचनेच्या हरकती, सूचनांनुसार सुनावणी होत नाही, याविषयी विधिमंडळ अधिवेशन काळातही सभागृहात चर्चा झाल्याचे पाटील यांचे म्हणणे आहे. केवळ राजकीय स्वार्थापायी गावांना केडीएमसीत समाविष्ट केल्याचा आरोप पाटील यांचा आहे. २७ गावांच्या विकासासाठी ही गावे या महापालिकेतून वेगळी करणे अनिवार्य आहे, अशी मागणी पाटील यांनी निवेदनात केली आहे.
पाटील यांनी आव्हाड यांना निवेदन दिले. त्यावेळी माजी खासदार व राष्ट्रवादीचे ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे आणि आ. जगन्नाथ शिंदे उपस्थित होते. या निवेदनाची प्रत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदामंत्री व राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनाही पाठविली आहे.
आव्हाड यांचा केला सत्कार
गृहनिर्माणमंत्रीपदी आव्हाड यांची निवड झाल्याबद्दल वंडार पाटील आणि सुधीर पाटील यांच्या वतीने पुष्पगुच्छ आणि सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.