ठाणे : सध्याच्या निराश करणाऱ्या वातावरणात उद्याच्या पिढीला आशादायक वातावरण निर्माण करण्याची गरज असल्याचे मत प्राचार्या डॉ. मंगला सिन्नरकर यानी व्यक्त केले . शारदा प्रकाशनाने प्रकाशीत केलेल्या "मंगल - दीप " या मराठी इंग्रजी पुस्तकाच्या प्रकाशन सोहोळ्यात अध्यक्षा म्हणून त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर डॉ. मंगला सिन्नरकर , माधवी जोशी , दीपक पुरंदरे , मृण्मयी राजे , प्राची राजे, लक्ष्मीकांत साटेलकर , प्रकाशक संतोष राणे उपस्थित होते .
यावेळी बोलताना डॉ. सिन्नरकर म्हणाल्या की नव्या पिढीपुढे आदर्श निर्माण करण्यासाठी मृदुला राजे यांच्या सारख्या कन्येने आपल्या आईचे चरित्र लिहून दृष्टिआड़ जाणारे कार्य लोकांसमोर आणले आहे . इतकेच काय पण चरित्रनायिकेच्या नातीने म्हणजे प्राची राजे यांनी हे पुस्तक इंगर्जी भाषेत अनुवादीत केले . अशा होकारात्मक गोष्टीच उद्याच्या पिढीला दीपस्तंभासारख्या मार्गदर्शक ठरतील. अशा चरित्रातुनच नव्या पिढी पुढे आदर्श ठेवला जाईल. ठाणे येथील भूतपूर्व शैक्षणिक कार्यकर्त्या आणि समाज सेविका मंगला फडणीस ह्यांच्या २५व्या स्मृती- दिनाच्या निमित्ताने त्यांच्या कन्या मृदु ला राजे, प्रतिमा बावकर आणि सोनल साटेलकर ह्यांनी मंगला फडणीस स्मृति-समारंभाचे आयोजन केले होते. ह्या समारंभामध्ये मृदुला राजे लिखित " मंगल -दीपः मंगला फडणीस ह्यांचा जीवन - परिचय" ह्या प्रा. संतोष राणे यांनी शारदा प्रकाशन तर्फे प्रकाशित केलेल्या मराठी पुस्तकाचे आणि मृदुला राजे ह्यांची कन्या प्राची राजे हिच्या "मंगल - दीप : बायोग्राफी ऑफ मंगला फडणीस " ह्या ईंग्रजी पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.पुस्तकाच्या प्रस्तावना लेखिका प्राचार्य मंगला सिन्नरकर ह्यांच्या हस्ते मराठी पुस्तकाचे आणि जमशेदपूर येथील उद्योजक दीपक पुरंदरे ह्यांच्या हस्ते इंग्लिश पुस्तकाचे अनावरण करण्यात आले. ह्या प्रसंगी कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून माधवी उन्मेष जोशी ह्या कोहिनूर ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजच्या एक निर्देशिका उपस्थित होत्या. त्यांनी आपल्या भाषणात प्राची राजे हिच्या लेखनाचे खास कौतुक केले. कार्यक्रमाच्या द्वितीय चरणात ठाणे जिल्ह्यातील काही समाज कार्य करणा-या महिलांना सन्मानित करण्यात आले. ह्या मध्ये ज्योत्स्ना प्रधान, माधवी नाईक, शिल्पा कशेळकर, श्यामाश्री भोसले आणि बर्नाडेट पिमेन्टा ह्यांना मानवंदना देण्यात आली. तसेच अपर्णा राजे व स्मिता चित्रे ह्यांनाही सन्मानीत करण्यात आले. ठाण्यातील प्रसिद्ध उद्योजक श्री अमीत गडकरी यांच्याशी संवाद साधत डाॅ. अद्वैत साटेलकर ह्यांनी त्यांच्या कार्य कर्तृत्वाचा परिचय करून दिला. माधवी जोशी ह्यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला. सोनल साटेलकर आणि त्यांच्या कुटुंबियांनी श्रीमती मंगला मदन फडणीस फाऊंडेशन ह्या ट्रस्टची घोषणा करून ह्या ट्रस्टतर्फे भविष्यात राबविल्या जाणा-या कार्याविषयीची माहिती दिली. स्वागताध्यक्ष अॅड . लक्ष्मीकांत साटेलकर ह्यांनी मान्यवरांचा सत्कार केला आणि सोनल साटेलकर ह्यांनी आभार प्रदर्शन केले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राची राजे हिने खुमासदार शैलीत केले.